मुंबई, 30 जानेवारी भारतातल्या जवळपास सर्वच भागांमध्ये पितृसत्ताक पद्धत अस्तित्वात आहे. मुली किंवा महिलांपेक्षा मुलांना व पुरुषांना अधिक मानाचं स्थान दिलं जातं. परक्याचं धन समजून आपल्याकडे मुलीची लग्नात नवऱ्याच्या घरी पाठवणी केली जाते. काही जमातींमध्ये आजही स्त्रियांना खूप महत्त्व दिलं जातं. त्या जमातीत मुलांची पाठवणी केली जाते. भारतातल्या मेघालय, आसाम आणि बांगलादेशच्या काही भागांमध्ये असलेल्या खासी जमातीच्या नागरिकांमध्ये ही प्रथा आजही पाहायला मिळते.
एकीकडे मुलगी झाली म्हणून तिला मारून टाकण्याची मानसिकता असणारे नागरिक आपल्या देशात असताना मुलींच्या जन्मानंतर उत्सव साजरा करणारे नागरिकही याच भारतात आहेत. मेघालय, आसाममध्ये, तसंच बांगलादेशच्या काही भागांत खासी जमातीमध्ये तशी परंपरा आहे. त्यांच्यात मुलगे हे परक्याचं धन समजले जातात, तर मुली व स्त्रिया देवाचं रूप मानल्या जातात. त्यामुळे कुटुंबात स्त्रियांना उच्च दर्जा दिला जातो. ही जमात स्त्रियांना महत्त्व देणारी आहे. मुलींचा जन्म झाल्यानं दुःखी होणाऱ्या सर्वांसाठी हा आदर्श आहे. खासी जमातीमध्ये स्त्रियांबाबत असलेल्या प्रथा आणि परंपराही इतर भागातल्या परंपरांपेक्षा वेगळ्या आहेत.
या जमातीमधली सर्वांत वेगळी परंपरा लग्नाबाबतची आहे. इथे मुलींची पाठवणी केली जात नाही, तर लग्न झाल्यावर मुलगाच सासरी जातो. मुली कायम आई-वडिलांसोबत राहतात. घरजावई होणं ही आपल्याकडे अपमानास्पद गोष्ट समजली जाते. खूपच अपवादात्मक परिस्थितीत मुलं घरजावई होऊन राहतात; मात्र खासी जमातीतले नागरिक तसं समजत नाहीत. मुलगी कायम आई-वडिलांसोबत राहत असल्यानं त्यांच्या संपत्तीचा वारसाही मुलीलाच मिळतो. एकापेक्षा जास्त मुली असतील, तर धाकट्या मुलीला सर्वांत जास्त हिस्सा मिळतो. यासोबत तिच्यावर जबाबदारीही असते. कुटुंबातल्या लग्न न झालेल्या भावंडांची व आई-वडिलांची जबाबदारी त्या मुलीवरच असल्यानं तिला संपत्तीतही जास्तीचा वाटा मिळतो.
खासी जमातीमध्ये स्त्रियांना एकापेक्षा अधिक लग्न करण्याची मुभा असते. या जातीतल्या पुरुषांनी ही प्रथा बदलण्याची आजवर अनेकदा मागणी केलीय. स्त्रियांना हीन लेखण्याची इच्छा नसून, त्यांचे अधिकारही कमी करण्याची आमची इच्छा नाही, असं खासी जमातीतल्या पुरुषांचं म्हणणं आहे. स्त्रियांप्रमाणेच पुरुषांनाही समान अधिकार मिळावेत, असं त्यांना वाटतं. खासी जमातीमध्ये घरातले महत्त्वाचे निर्णय स्त्रियाच घेतात. बाजार व दुकानांमध्येही स्त्रियाच कारभार पाहतात. या जमातीमधल्या मुलांची उपनावं आईच्या नावावरून ठेवली जातात. धाकट्या मुलीचं घर सर्व नातेवाईकांसाठी कायम खुलं असतं. मेघालयच्या गारो, खासी, जयंतिया या जमातींमध्ये मातृसत्ताक पद्धत अस्तित्वात आहे. त्या सर्व जमातींमध्ये अनेक नियमही एकसारखेच असतात.
खासी समुदायात विवाहासाठी काही विशेष सोहळा किंवा पद्धत नसते. मुलगी आणि आई-वडिलांची संमती मिळाल्यावर मुलगा सासरी येणं-जाणं आणि तिथे राहणं सुरू करतो. या दाम्पत्याला मूल झाल्यानंतर मुलगा कायमस्वरूपी सासरी राहायला सुरुवात करतो. काही खासी व्यक्ती वेगळे होऊन मुलीच्या घरी राहू लागतात. लग्नाआधी मुलग्याच्या कमाईवर त्याच्या आई-वडिलांचा अधिकार असतो आणि लग्नानंतर त्याच्या कमाईवर त्याच्या सासू-सासऱ्यांचा अधिकार असतो. घटस्फोट घेणंही या जमातीत खूप सुलभ असतं. घटस्फोटानंतर आपल्या मुलावर वडिलांचा कोणताही अधिकार राहत नाही
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Wedding