भारतात रुग्णाला तपासायला फक्त दोनच मिनिटं पुरेसे ?

भारतात रुग्णाला तपासायला फक्त दोनच मिनिटं पुरेसे ?

भारताच्या प्राथमिक उपचार केंद्रांवरचे डॉक्टर रूग्णांना सरासरी 2 मिनिटंच तपासतात अशी धक्कादायक माहिती एका आंतरराष्ट्रीय वैद्यकीय सर्वेक्षणात समोर आली आहे.

  • Share this:

09 नोव्हेंबर: भारताच्या प्राथमिक उपचार केंद्रांवरचे डॉक्टर रूग्णांना सरासरी 2 मिनिटंच तपासतात अशी धक्कादायक माहिती  एका आंतरराष्ट्रीय वैद्यकीय  सर्वेक्षणात समोर आली आहे. इंग्लडमधील बीएमजे (ब्रिटिश मेडिकल जरनल) या  मासिकाने जगभर रूग्ण-डॉक्टर यांचा अभ्यास करणारं हे सर्वेक्षण केलं आहे. याच सर्वेक्षणानुसार बांग्लादेश आणि पाकिस्तानात रुग्णांची याहूनही वाईट परिस्थिती आहे. या देशांमध्ये डॉक्टर रुग्णांना सरासरी फक्त 48 सेकंद आणि 1.3 मिनिटात तपासतात.

पण पाश्चिमात्य  देशांमध्ये मात्र चित्र वेगळं आहे.  स्वीडन, अमेरिका आणि नॉर्वेमध्ये  डॉक्टर रुग्णाला सरासरी 20 मिनिटं तपासतात.  इंग्लंडच्या वेगवेगळ्या हॉस्पिटल्समधील तज्ज्ञांनी जगभर हे सर्वेक्षण केलं. या संशोधनानुसार जगातील सुमारे 50% लोकसंख्येनं व्यापलेल्या 18 देशांमध्ये पाच मिनिटं किंवा त्यापेक्षा कमी वेळ डॉक्टर रुग्णांना तपासतात. एवढ्या कमी वेळात रुग्णांना सल्ला देणं म्हणजे रुग्णांच्या आरोग्याशी खेळण्यासारखंच आहे आणि त्याने त्या डॉक्टरांवरही प्रचंड ताण पडतो. महागडी औषधं, औषधांबद्दलची अपुरी माहिती आणि डॉक्टरांसोबत कमी मोकळेपणा  या  सगळ्यामुळे  रुग्णांचं नुकसान होतं. कमी वेळात तपासून  दिलेला सल्ला हा आरोग्याला हानीकारक  ठरू शकतो.  भारतातील स्थानिक तज्ज्ञांनुसार दवाखान्यांमध्ये गर्दीच्या वेळेत मदत करण्यासाठी प्राथमिक काळजी घेणाऱ्या डॉक्टरांची संख्या कमी आहे.

रूग्णालयांमध्ये प्रचंड गर्दी असल्यामुळे रुग्णांना डॉक्टरांसोबत जास्त वेळ घालवता येत नाही हे खरं आहे. सार्वजनिक रुग्णालयांमध्ये डॉक्टर ओपीडीच्या गर्दीमुळे एकाच वेळी दोन ते तीन रुग्णांना तपासतात . त्यामुळे डॉक्टरांकडून रुग्णांना तपासण्यात चुका होतात अशी माहिती आरोग्य विषयातील तज्ज्ञ डॉ. रवी दुग्गल यांनी दिली आहे.

तसंच खासगी रूग्णालयांमध्ये  आणि दवाखान्यातही  परिस्थिती फार वेगळी नाही.  खाजगी डॉक्टर्स विशेषत: प्राथमिक डॉक्टर्स गर्दीच्या वेळी ओपीडीमध्ये रूग्णांची फक्त लक्षणे विचारूनच त्यांना औषधं देतात. ते रुग्णांना तपासतही नाही आणि म्हणूनच  रुग्णांचे रोगाचे निदान करण्याची डॉक्टरांची क्षमता कमी होते.

माजी महाराष्ट्र मेडिकल काऊंसिलचे सदस्य डॉ. सुहास पिंगळे यांनी गर्दी असलेली रूग्णालये आणि क्षमतेपेक्षा जास्त ताण पडत असलेल्या या देशातील आरोग्य व्यवस्थेला  दोष दिला आहे. ते म्हणाले की, ''मुंबईमध्ये महानगरपालिकेची 3 सुपरस्पेशॅलिटी रुग्णालयं, 5 स्पेशल रुग्णालयं, 18 गरिबांसाठीची रुग्णालयं, 28 मातृत्व गृह, 161 दवाखाने आणि 168 आरोग्यसेवा केंद्र आहेत. मुंबईची लोकसंख्या 1.5 कोटी  आहे. त्यामुळे  प्रत्येक दवाखान्यावर कमीत कमी 1 लाख रुग्णांचा भार आहे.   अशात जर 10% लोकसंख्या आजारी पडली, तरी त्याचा मोठा परिणाम रुग्णालयांवर पडतो.

याउलट  अमेरिकेत आणि इंग्लंडमध्ये दिवसाला फक्त 6 ते 7 रुग्णांना तपासले जाते. चांगला डॉक्टर कधीही जास्त पैसे घेत नाही आणि कायम रुग्णांच्या सेवेसाठी हजर असतो, असा आमचा भारतीयांचा समज आहे. पण तसं कधीही होत नाही.

स्थानिक डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, ''आपल्याकडचे येणारे रूग्ण वाढवण्यासाठी काही डॉक्टर्स कमी पैसे घेतात. त्यांच्याकडे वेळ नसल्यामुळे ते कमी वेळात रूग्णांना तपासतात.''

पाश्चात्त्य आणि भारतीय डॉक्टरांच्या रुग्णांमधला मुख्य फरक म्हणजे वेगवेगळे रोग आणि आजार. 'स्वीडनमध्ये, शारीरिक व्याधींपेक्षा रुग्ण मनोवैज्ञानिक समस्यांनी जास्त त्रस्त आहेत.तर भारतात चित्र उलटं आहे.  त्यामुळे भारतामध्ये, डॉक्टरांना  आलेल्या रूग्णाच्या आजाराची अचूक  माहिती असेल, तर मोठ्या संख्येने रूग्णांना हाताळणं सोपं जाईल,'  असंही डॉ. पिंगळे यांनी सांगितलं.

बीएमजेच्या  या अभ्यासात देशातील गरीब प्राथमिक आरोग्यसेवांच्या संपूर्ण चित्राकडे पाहण्यात आलं आहे. त्यामुळे यावरून भारतीय रूग्णांची परिस्थिती सुधारण्याकडे सरकार लक्ष देतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 9, 2017 06:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading