नवी दिल्ली, 19 जानेवारी : अनेकदा लहान म्हणवणारी मुलंही खेळता-खेळता मोठाच गंभीर प्रकार करतात. यात अनेकदा निष्पाप मुलांचा जीवही जातो. दिल्लीच्या सीमावर्ती भागातल्या नांगलोई या भागात असाच एक हिंसक प्रकार (violent incident) घडला आहे. इथं काही मुलं मैदानात (ground) क्रिकेट (cricket) खेळत होती. आणि खेळता-खेळताच त्यातल्या एका 17 वर्षांच्या मुलाची (boy) हत्या (murder) करण्यात आली. कथितरित्या चाकूने (knife) भोसकून ही हत्या केली गेली आहे. पोलिसांनी (police) याप्रकरणात तीन मुलांना ताब्यात घेतलं आहे.
ही धक्कादायक घटना रविवारी घडली. याबाबत बोलताना एक वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणाले, की आरोपी असलेली मुलं त्यांच्या ग्रुपसह मैदानात रोज त्याच जागी क्रिकेट खेळायची. मात्र हत्या झालेला मुलगा तिथंच खेळायला आला. शनिवारी आरोपींनी या मुलासोबत भांडण केलं. सोबतच इथं क्रिकेट न खेळण्याबद्दल या मुलाला धमकीही दिली.
रविवारी हा हत्या झालेला मुलगा आपल्या दोस्तांसह क्रिकेट खेळत होता. हे आरोपी कदाचित काही गोष्टी मनाशी ठरवूनच तिथं आले. त्यांच्यासोबत त्यांच्या टीममधली इतरही मुलं होती. या आरोपींनी मुलासोबत मुद्दामहून भांडण उकरून काढलं. नंतर आरोपीनं आपल्या एका साथीदाराला चाकू आणायला सांगितला. आणि कुणाला काही कळेपर्यंत या मुलावर निर्दयपणे वार केले. हा मुलगा बेहोष झाला. यानंतर आरोपी आपल्या साथीदारांसह घटनास्थळावरून पसार झाले.
पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं, की मुलाला जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तिथं डॉक्टरांनी तपासल्यावर त्याला मृत घोषित करण्यात आलं. याप्रकरणात केस दाखल करण्यात आली असून तीन मुलांसह पाच जणांना अटक केली गेली आहे.