pulwama attack : काय करणार मोदी सरकार? सर्वपक्षीय बैठकीत घेणार निर्णय

pulwama attack :  काय करणार मोदी सरकार? सर्वपक्षीय बैठकीत घेणार निर्णय

उरी हल्ल्यानंतरही घेतली सर्वपक्षीय बैठक होती. त्यानंतर भारताने सर्जिकल स्ट्राईक केला होता.

  • Share this:

नवी दिल्ली, 16 फेब्रुवारी : पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत मोदी सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. सकाळी 11 वाजता गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली संसदेच्या लायब्ररीत ही बैठक होणार आहे. या बैठकीत पुलवामा हल्ल्यावर सरकारचे पुढचे पाऊल काय असेल याची कल्पना सर्व पक्षांना देण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या एका बैठकीनंतर सर्वपक्षीय बैठक बोलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मोदी सरकार पुलवामा हल्ल्यानंतर काही करण्यापूर्वी त्याबाबत विरोधी पक्षांना विश्वासात घेणार असल्याची चर्चा आहे.

याआधी दहशतवादी हल्ल्यानंतर सर्वपक्षीय बैठक सप्टेंबर 2016 मध्ये झाली होती. त्यानंतर भारताने सर्जिकल स्ट्राईक केला होता. त्यावेळी विरोधी पक्षांचे मत न घेता त्यांना फक्त सरकार काय करणार आहे याची माहिती दिली होती.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुलवामा हल्ल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत आम्ही देशासोबत आहोत असे सांगत विरोधी पक्ष देश आणि सरकारच्या सोबत उभा असल्याचे म्हटले होते.

गृहमंत्री राजनाथ सिंह शुक्रवारी पुलवामा येथे गेले होते. त्यांनी हल्ल्यानंतरच्या परिस्थितीचा आढावा घेतला. पुलवामा हल्ल्यातील शहिदांचे पार्थिव श्रीनगरहून दिल्लीला आणण्यात आले आहे. पंतप्रधान मोदींनी शहिदांना श्रद्धांजली वाहीली. यावेळी विरोधी पक्षांच्या नेत्यांसह अनेक केंद्रीय मंत्री विमानतळावर श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पोहचले होते.

काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरा येथे गुरुवारी सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यातील वाहनांवर दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. यात 37 जवान शहीद झाले. स्फोटकांनी भरलेली गाडी सीआरपीएफ जवानांच्या गाडीवर आदळून हल्ला केला. यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे.

First published: February 16, 2019, 7:03 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading