तेहरान,23 एप्रिल : भारत आणि पाकिस्तान यांच्या सीमा लागून आहेत, हे दोन देश शेजारी आहेत. पण जर्मनी आणि जपान हे देश शेजारी कधीपासून झाले? पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या एका वक्तव्यामुळे सगळ्यांनाच हा प्रश्न पडला आहे.
इम्रान खान आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रूहानी यांनी तेहरानमध्ये एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यामध्ये इम्रान खान यांनी जपान आणि जर्मनी हे शेजारी देश असल्याचा दावा केला. पुन्हापुन्हा ते याबद्दल बोलत राहिले.
जर्मनी आणि फ्रान्स
इम्रान खान यांना खरंतर जर्मनी आणि फ्रान्स हे शेजारी देश आहेत, असं म्हणायचं होतं. पण त्यांनी फ्रान्सऐवजी जपानचा उल्लेख केला आणि आपलं म्हणणं तपशीलवार मांडलं.
😳 our Prime Minister thinks that Germany & Japan share a border. How embarrassing, this is what happenes when you @UniofOxford let people in just because they can play cricket. https://t.co/XJoycRsLG9
— BilawalBhuttoZardari (@BBhuttoZardari) April 23, 2019
इम्रान खान यांच्या या चुकीनंतर ट्विटरवर #JapanGermanyBorder असा हॅशटॅग ट्रेन्ड झाला आहे. त्यासोबतच जर्मनी आणि जपान हे शब्दही ट्रेन्ड झाले.
बोलतच राहिले इम्रान खान
इम्रान खान असं म्हणत असतानाचा त्यांचा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट करण्यात आला आहे.'दोन देश एकमेकांसोबत जितका जास्त व्यापार करतात तेवढे त्या देशांमधले संबंध दृढ होतात. जर्मनी आणि जपान या देशांनी एकमेकांची माणसं मारली पण त्यानंतर जर्मनी आणि जपान या देशांनी सीमाभागात संयुक्तपणे उद्योग उभारले.' असं ते या व्हिडिओमध्ये म्हणत आहेत.
इम्रान खान यांनी हे बोलताना सतत जर्मनी आणि जपान यांची सीमा असा उल्लेख केला. त्यांना खरंतर जर्मनी आणि फ्रान्स या देशांबद्दल बोलायचं होतं. पण आपण चुकीचं बोलतो आहोत हेही त्यांच्या लक्षात आलं नाही.
भूगोल आणि इतिहास बदलला
इम्रान खान यांनी हा भूगोल आणि पर्यायाने इतिहासही बदलल्यामुळे या पत्रकार परिषदेत उपस्थित असलेले दिग्गज लोकही गोंधळून गेले.
जपान हा पॅसिफिक महासागरातला अतिपूर्वेकडचा देश आहे तर जर्मनी हा मध्य युरोपातला देश आहे. हे देश एकमेकांपासून दूर अंतरावर आहेत पण इम्रान खान यांचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतो, अशा प्रतिक्रिया ट्विटरवर उमटल्या आहेत.
===============================================================================================
VIDEO : मनसेसैनिकांचा नवा लूक, 'लाव रे तो व्हिडिओ'
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा