भुवनेश्वर, 07 मे: मागच्या 24 तासांपासून दक्षिण अंदमान समुद्रावर (South Andaman Sea) कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे चक्रीवादळ (cyclone) होण्याची शक्यता आहे. हे वादळ पुढच्या आठवड्याच्या सुरुवातीला आंध्र प्रदेश आणि ओडिशा किनारपट्टीवर पोहोचण्याची शक्यता आहे, या पार्श्वभूमीवर ओडिशामध्ये अलर्ट (Odisha alert) जारी करण्यात आला आहे. या चक्रीवादळाच्या आगमनामुळे पूर्व किनारपट्टीच्या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, दक्षिण अंदमान समुद्र आणि आग्नेय बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचे क्षेत्र उत्तर-पश्चिम दिशेने सरकण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान विभागाचे (IMD) महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले की, कमी दाबाचे क्षेत्र उत्तर-पश्चिम दिशेने सरकण्याची शक्यता आहे, परिणामी बंगालच्या पूर्व-मध्यभागी चक्रीवादळ निर्माण होईल. अदाजे 10 मे रोजी किनारपट्टीवर पोहोचण्याची शक्यता आहे. महापात्रा म्हणाले की, ते प्रथम कुठे येईल, याबाबत अद्याप कोणतेही भाकीत करणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले.
Cyclone Updates from @Indiametdept. System likely to intensify into a cyclonic storm by 8th evening. After reaching near Odisha coast, it will likely recurve & move NNE. N Andhra & Odisha coasts to experience strong winds & heavy rains. Follow @Indiametdept for official updates. pic.twitter.com/NRlEvC1Rm0
— Madhavan Rajeevan (@rajeevan61) May 7, 2022
महापात्रा म्हणाले, जेव्हा वादळ किनार्याजवळ पोहोचेल तेव्हा ते कुठे धडकेल हे सांगता येईल. 9 मे पासून समुद्राची स्थिती बिघडू शकते, त्यामुळे मच्छीमारांनी घराबाहेर पडू नये.अंदाजानुसार चक्रीवादळाचा वेग समुद्रात 80-90 किमी प्रतितास असेल. चक्रीवादळाची शक्यता लक्षात घेता, हवामान विभागाने पुढील आठवड्यात मंगळवार ते शुक्रवार या कालावधीत पश्चिम बंगालमधील गंगा नदीच्या परिसरातील जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
हे ही वाचा : Bitcoin, Ethereum, Dogecoin सारख्या क्रिप्टोकरन्सी 6 महिन्यात अर्ध्यावर; गुंतवणूकदारांनी आता काय करावं?
एनडीआरएफ आणि अग्निशमन सेवा दलाचे जवान सतर्क
ओडिशाचे विशेष मदत आयुक्त (एसआरसी) पीके जेना म्हणाले कि, एनडीआरएफच्या 17 टीम, ओडीआरएएफच्या 20 टीम आणि अग्निशमन सेवेच्या 175 टीमना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. अग्निशमन सेवा महासंचालक एसके उपाध्याय यांनी सांगितले की, अग्निशमन दलाच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. कोणतीही जिवीत हानी होणार नाही याची काळजी आतापासूनच घेतली जाणार असल्याचे ते म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.