नवी दिल्ली 29 मे : बाबा रामदेव (Baba Ramdev) आणि इंडियन मेडिकल असोसिएशन (Indian Medical Association) यांच्यामध्ये मागील अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. याचदरम्यान आता आयएमएचे राष्ट्रीय प्रमुख डॉ. जे ए जयलाल (Johnrose Austin Jayalal) यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, की एएमआय रामदेव बाबांच्या विरोधात नाही. ते म्हणाले, की बाबा रामदेव यांनी आधुनिक औषधाविरोधात केलेलं आपलं विधान मागे घ्यावं. त्यांनी असं केल्यास आम्ही पोलिसांत त्यांच्याविरूद्ध केलेली तक्रार मागे घेऊ.
डॉ. जयलाल पीटीआयसोबत बोलताना म्हणाले, की आम्ही रामदेव बाबांच्या विरोधात अजिबातही नाही. मात्र, रामदेव बाबांनी केलेलं विधान कोरोना लशीच्या विरोधात आहे. त्यांचं हे विधान लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करणारं आणि लोकांना गोंधळून टाकणारं आहे. डॉक्टर जयलाल म्हणाले, की आम्हाला जास्त भीती याची आहे, की रामदेव बाबांना फॉलो करणारं मोठा वर्ग आहे, त्यामुळे त्यांच्या या विधानाचा थेट परिणाम या लोकांवर होणार आहे.
डॉक्टरांविरोधात केलेल्या वादग्रस्त विधानाप्रकरणी IMA च्या उत्तराखंडमधील शाखेनं पतंजलि प्रमुख रामदेव बाबा यांना मानहानीची नोटीस पाठवली आहे. या नोटीसमध्ये असं म्हटलं गेलं आहे, की बाबा रामदेव यांनी आपल्या या विधानासाठी पंधरा दिवसाच्या आत माफी मागावी. अन्यथा आयएमए त्यांच्याविरोधात 1000 कोटीचा दावा करेल. डॉक्टरांच्या संघटनेनं अशी मागणी केली आहे, की रामदेव बाबा यांनी आपल्या या विधानासाठी लिखित स्वरुपात माफी मागावी. अन्यथा कायदेशीर पद्धतीनं दावा करण्यात येईल.
IMA नं रामदेव यांच्या पतंजलि कंपनीचं उत्पादन असणाऱ्या श्वासरी कोरोनिल किटबाबतही आक्षेप नोंदवला आहे. संघटनेनं म्हटलं आहे, की ही सूचना मिळाल्यानंतर 76 तासाच्या आत कोरोनिल किटबाबतच्या सर्व जाहिराती मागे घ्या. ज्यात दावा केला गेला आहे, की कोरोना लस घेतल्यानंतर हे साइट इफेक्टपासून बचाव करतं आणि कोरोनाच्या संसर्गापासून बचावासाठीही प्रभावी आहे. IMA नं रामदेव बाबांसह त्यांच्या सहकाऱ्यांवर कोरोनिल किटबाबत चुकीचा प्रचार केला जात असल्याचा आरोप केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Baba ramdev, Coronavirus