अहमदाबाद,4मार्च - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा कुरापती पाकिस्तानला अप्रत्यक्षरित्या इशारा दिला आहे. गुजरातमध्ये जनसभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'एअर स्ट्राईकदरम्यान वायुदलाकडे जर राफेल विमान उपलब्ध असते तर आजची परिस्थिती वेगळीच असती. आपला एकही जवान शहीद झाला नसता आणि त्यांचा एकही माणूस वाचला नसता'.
एअर स्ट्राईकचे पुरावे मागणाऱ्या विरोधकांवरही पंतप्रधान मोदींनी जोरदार हल्लाबोल केला. पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'दहशतवादाचा खात्मा व्हावा, यावर संपूर्ण देश सहमत आहे. दहशतवादाविरोधात भारतीय सेना कारवाई करत आहे. पण काही लोकांना सैन्याचा कारवाईवर विश्वास नाहीय'.
शिवाय, देश उद्धवस्त करण्याचा विचार करणाऱ्यांविरोधात आम्ही शांत बसणार नाही, असे सांगत पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला खडेबोल सुनावले
आहेत.
Prime Minister Narendra Modi in Jamnagar, Gujarat: If the Indian Air Force had the #Rafale today, the situation would have been different. I can't do anything if some people fail to understand this. pic.twitter.com/zsawROcO0R
— ANI (@ANI) March 4, 2019
राफेल भारतात कधी दाखल होणार?
दरम्यान, राफेल विमान करारावरून गेल्या अनेक दिवसांपासून देशभरात मोठा गदारोळ सुरू आहे. अशातच आता राफेल विमान भारतात नक्की कधीपर्यंत येऊ शकेल, याबाबत भारतीय वायुदलाचे प्रमुख बिरेंदर सिंह धानोआ यांनी माहिती दिली आहे. 'राफेल ही लढाऊ विमानं साधारणपणे याच वर्षी सप्टेंबरपर्यंत दाखल होतील,' असं बिरेंदर सिंह धानोआ यांनी काही वेळापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत म्हटलं आहे. त्यामुळे मोठ्या वादानंतर राफेल विमानं भारतात दाखल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
PM Modi in Jamnagar, Gujarat: The nation agrees that the menace of terror has to be eliminated. I want to ask you, don't you trust what our armed forces say? We should be proud of our armed forces. pic.twitter.com/zx71igb81d
— ANI (@ANI) March 4, 2019
राफेलबाबत काय आहे पंतप्रधान मोदींचं म्हणणं?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर त्यांच्याच बालेकिल्ल्यातून जोरदार निशाणा साधला. आमचे सरकारच पहिले राफेल विमान उडवणार, असंही मोदी अमेठीत म्हणाले. राफेल विमान प्रकरणावरुन काँग्रेसला टार्गेट करताना पंतप्रधान मोदींनी म्हटलं की, ही लोक वर्षानुवर्षे राफेल विमानांच्या खरेदी करारावरच अडून बसले होते. जेव्हा सरकार सत्तेतून जाण्याची वेळ आली तेव्हा संबंधित करार बासनात गुंडाळला. मग आमचे सरकार आहे आणि दीड वर्षाच्या आतच करारावर स्वाक्षरी करण्यात आली आणि काही महिन्यांतच देशाच्या शत्रूंना धक्के देण्यासाठी पहिले राफेल विमान आकाशात झेपावणार आहे, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.
काय आहे राहुल गांधींचा आरोप?
राफेल या लढाऊ विमान खरेदी प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा भ्रष्टाचार केला, असा राहुल गांधींचा आरोप आहे. 'राफेल विमानांची मोदी सरकारने अचानक किंमत वाढवली. तसंच भारतातील अनुभवी कंपनी 'एचएएल'ला डावलून राफेल करारामध्ये उद्योजक अनिल अंबानी यांच्या कंपनीचा समावेश करण्यात आला. हे सर्व अनिल अंबानींच्या वैयक्तिक फायद्यासाठी केलं गेलं,' असा राहुल गांधींचा आरोप आहे.