29 नोव्हेंबर : आता दहावी आणि बारावी जर तुम्हाला उत्तीर्ण व्हायचं असेल तर 'काठावर' पास होण्याची टक्केवारी आता आणखी कमी करण्यात आलीये. दहावीसाठी आता 33 टक्के गुणांवर उत्तीर्ण होता येणार आहे.
देशभरातील सर्व शैक्षणिक मंडळांची गुणांकन पद्धत एकसमान असावी या प्रयत्नांचा भाग म्हणून कौन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एग्झॅमिनेशन (आयसीएसई) या मंडळाने आपल्या दहावी आणि बारावी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठीची किमान गुणांची टक्केवारी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. दहावी उत्तीर्णतेसाठी आता ३५ वरून ३३ टक्के आणि बारावीसाठीची ४० वरून ३५ टक्के किमान गुण मिळवणे आवश्यक असून पुढील शैक्षणिक वर्षापासून (सन २०१८-१९) त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.
विविध शैक्षणिक मंडळांच्या परीक्षा आणि गुणांकन पद्धतींबाबत असलेल्या समस्यांबाबत विचार करण्यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाने गेल्या मे महिन्यात आंतरमंडळीय कार्यगटाची स्थापना केली होती.
या मंडळाने सुचवलेल्या अनेक शिफारसींमध्ये एकसमान गुणांकन पद्धतीची महत्त्वपूर्ण शिफारस असून, तिची अंमलबजावणी करण्यासाठीच 'आयसीएसई'ने दहावी व बारावी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठीची टक्केवारी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा