नवी दिल्ली 02 डिसेंबर: कोरोनाची (Covid-19) लागण झाल्यामुळे विदेशात अडकलेल्या 50 शास्त्रज्ञांची भारतीय हवाईदलाने सुटका केली आहे. त्या सगळ्या शास्त्रज्ञांना भारतात परत आणण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हे सर्व शास्त्रज्ञ मध्य आशियातल्या एका देशात अडकले होते. त्या देशातल्या आरोग्य व्यवस्थेवर ताण असल्याने त्यांना तातडीने देशात आणणं गरजेचं होतं त्यामुळे हवाई दलाची मदत घेण्यात आली होती. ‘इंडिया टुडे’ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
हवाई दलाने त्यासाठी C-17 ग्लोबमास्टर या मालवाहू विमानाची निवड केली. 9 तासांचा प्रवास करत हे विमान तिथे पोहोचलं आणि त्या सगळ्या शास्त्रज्ञांना घेऊन परत आलं. 19 तासांची ही विशेष मोहिम यशस्वी ठरली.
या शास्त्रज्ञांचं इन्फेक्शन कुठल्या पद्धतीचं आहे याची आधीच खात्री भारतीय डॉक्टरांनी केली होती. त्यानुसार त्यांना औषधोपचार घेण्यास सांगण्यात आले होते. हे विमान मोठं असल्याने त्यात कोविड रुग्णांच्या उपचाराची व्यवस्था करण्यात आली होती.
विमानतळावर उतरल्यानंतर दोन तास हे विमान तिथे होतं. नंतर सगळ्या शास्त्रज्ञांना घेऊन त्याने उड्डाण केले. एका संशोधन प्रकल्पावर काम करण्यासाठी ते सगळे शास्त्रज्ञ तिथे गेले होते. त्यांना कोरोनाची बाधा झाली होती. मात्र त्या देशात रुग्णांची संख्या जास्त होती. त्यात आरोग्य व्यवस्थेवर ताण पडत होता. त्यामुळे उचाराच दिरंगाई होऊ नये म्हणून भारतातने त्यांना परत आणण्याचा निर्णय घेतला. यातल्या एका शास्त्रज्ञाची प्रकृती गंभीर आहे.
संरक्षण मंत्रालय, विदेश मंत्रालय आणि आरोग्य मंत्रालयाने संयुक्तरित्या ही मोहिम राबवली आहे. आता या सगळ्या शास्त्रज्ञ रुग्णांवर उपचार करण्यात येत असून त्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.