मोदींचा चाणक्य आता दिल्लीश्वरांना करणार मदत, निवडणुकीआधी मोठी घोषणा!

मोदींचा चाणक्य आता दिल्लीश्वरांना करणार मदत, निवडणुकीआधी मोठी घोषणा!

नरेंद्र मोदींच्या प्रचारासाठी आफ्रिकेतील नोकरी सोडून ते आले होते. 'अब की बार मोदी सरकार' अशी टॅगलाइन देणाऱ्या या चाणक्याची मदत आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल घेणार आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 14 डिसेंबर : आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विधानसभा निवडणुकांबाबत मोठी घोषणा केली आहे. त्यांनी ट्विट करून सांगितले की, प्रशांत किशोर यांची कंपनी आयपॅक दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षासोबत काम करणार आहे. दरम्यान, आज बिहारमध्ये प्रशांत किशोर आणि मुख्यमंत्री नीतिश कुमार यांची भेट होणार आहे. नागरिकत्व संशोधन कायद्याबाबत वेगळं मत असल्याने जेडीयूमध्ये प्रशांत किशोर यांना विरोध होत आहे.

बिहारचे माहिती आणि जनसंपर्क मंत्री नीरज कुमार यांनी पक्षाचे उपाध्यक्ष असलेल्या प्रशांत किशोर यांना सल्ला दिला आहे की, त्यांनी कोणताही भ्रम बाळगू नये फक्त मतांचे गणित बघा.

नागरिकत्व संशोधन विधेयकावर जेडीयूच्या भूमिकेविरुद्ध प्रशांत किशोर यांनी ट्विट केलं होतं. त्यात म्हटलं होतं की, नागरिकत्व संशोधन विधेयकाचे समर्थन करण्यापूर्वी जेडीयूच्या वरिष्ठ नेत्यांनी त्या लोकांचाही विचार करायला हवा होता ज्यांनी 2015 मध्ये पक्षावर विश्वास ठेवला.

त्यानंतर प्रशांत किशोर यांचे नाव न घेताच नीरज कुमार यांनी निशाणा साधला होता. यात त्यांनी म्हटले होते की, नीतिश कुमार विचार आणि काम या दोन्ही बाबतीत धर्मनिरपेक्ष आहेत. पारदर्शक काम हीच त्यांची ओळख आहे.  कोणताही भ्रम न बाळगता मतांचे गणित बघा. नीतिश कुमार यांचे नेतृत्व आणि जनादेश यातून स्पष्ट होईल. 2015 मध्ये विधानसभेच्या तुलनेत 2019 च्या लोकसभेत जेडीयूच्या मतांमध्ये 24.85 लाख मतांची वाढ झाली होती याची माहिती करून घ्या असंही ट्विटमध्ये म्हटलं होतं.

कोण आहेत प्रशांत किशोर?

- प्रशांत किशोर (वय-44) हे उत्तर प्रदेशच्या बलियाचे रहिवासी आहेत.

- प्रशांत किशोर हे संयुक्त राष्ट्राच्या 'हेल्थ मिशन'चे दक्षिण आफ्रिकेतील प्रमुख म्हणून काम पाहत होते.

- नरेंद्र मोदींच्या प्रचारासाठी आफ्रिकेतील नोकरी सोडून आले होते.

- भारतातील राजकारण आणि निवडणुकांत काम करण्यासाठी सिटीझन्स फॉर अकाऊंटेबल गव्हर्नन्स अर्थात CAG कंपनीची स्थापना केली.

- 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीत मोदींच्या सोशल मीडियाची जबाबदारी प्रशांत किशोर यांच्याकडे होती.

- 'अब की बार मोदी सरकार' ही टॅगलाईन प्रशांत किशोर यांचीच होती.

- प्रशांत किशोर यांच्या कंपनीने अनेक दिग्गजांच्या प्रचाराची कंत्राटं घेतली आणि त्यांना निवडून आणले.

- दरम्यान, 2015 मध्ये प्रशांत किशोर यांनी मोदींची साथ सोडली.

- बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपऐवजी त्यांनी नितीश कुमार यांच्या जेडीयूच्या प्रचाराची धुरा सांभाळली.

- बिहारमध्ये जेडीयूला भरघोस यश मिळून, नितीश कुमार सत्तेत आले.

- प्रशांत किशोर हे सध्या बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जेडीयूमध्ये दुसऱ्या क्रमांकाच्या पदावर आहेत.

- निवडणूक न लढवूनही प्रशांत किशोर यांना बिहारमध्ये राज्यमंत्रिपदाचा दर्जा आहे.

- बिहार निवडणुकीत जेडीयूची रणनीती प्रशांत किशोर यांनीच आखली होती. त्यामुळे जेडीयूला मोठं यश मिळालं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 14, 2019 10:59 AM IST

ताज्या बातम्या