दिल्लीतल्या हिंसाचारावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली पहिली प्रतिक्रिया

दिल्लीतल्या हिंसाचारावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली पहिली प्रतिक्रिया

'दिल्लीतल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतला. परिस्थिती लवकरात लवकर सुरळीत व्हावी यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.'

  • Share this:

नवी दिल्ली 26 फेब्रुवारी : राजधानी दिल्लीतल्या हिंसाचारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधानांनी हिंसाचारावर तीव्र चिंता व्यक्त करत शांतता राखण्याचं आवाहन केलंय. शांतता आणि सौहार्द हा आमच्या मुलभूत धोरणांचा भाग आहे. दिल्लीच्या बंधू आणि भगिनींनी शांतता राखावी असं आवाहनही पंतप्रधानांनी केलं. परिस्थिती पूर्वपदावर येणं याला सर्वोच्च प्राधान्य सरकार देत आहे असंही ते म्हणाले. दिल्लीतल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतला. परिस्थिती लवकरात लवकर सुरळीत व्हावी यासाठी सरकार प्रयत्नशील आहे असंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे. या आधी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधानांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं.

सोनिया गांधींचा भाजपवर हल्लाबोल

दिल्लीतल्या हिंसाचार हा सुनियोजित कट असून भाजपच त्याला जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केला. काँग्रेसच्या कार्यसमितीची आज बैठक झाली आणि त्यात दिल्लीतल्या हिंसाचारावर चर्चा करण्यात आली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपवर हा मोठा हल्ला केला. गेल्या तीन दिवसांपासून दिल्लीत हिंसाचार भडकलेला असताना गृहमंत्री अमित शहा कुठे होते असा सवालही त्यांनी केला.

भाजपच्या काही नेत्यांच्या चिथावणीखोर वक्तव्यामुळेच हा हिंसाचार भडकला असंही त्यांनी सांगितलं. पंतप्रधान गेली तीन दिवस कुठे होते असा सवालही त्यांनी केला. दिल्ली सरकारलाही परिस्थिती नियंत्रण आणण्यास अपयश आल्याचं त्यांनी सांगितलं. अमित शहा यांनी जबाबदारी स्विकारून राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली.

भाजपच्या अनेक नेत्यांनी चिथावणीखोर भाषणं देऊन भीती आणि व्देषाचं वातावरण निर्माण केलं होतं. भाजपच्या एका नेत्याने तर दिल्ली पोलिसांना तीन दिवसांची मुदत दिली होती. तीन दिवसानंतर आम्ही जबाबदार राहणार नाही असंही त्याने सांगितलं होतं. गेल्या 72 तासांपासून दिल्ली पेटलेली असताना केंद्र सरकार आणि राज्य सरकारने काहीही केलं नाही. त्यामुळे 20 लोकांचा जीव गेला असा आरोपही त्यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 26, 2020 02:49 PM IST

ताज्या बातम्या