हैदराबाद, 04 डिसेंबर : महाराष्ट्रात जसं पदविधर आणि विधान परिषद निवडणुकीचे निकाल हाती येत आहेत तसेच दुसरीकडे हैदराबाद नगरपालिका निवडणुकीचे निकाल देखील आज लागणार आहेत. या दोन्ही ठिकाणी भाजपला आपला गड काबीज करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. असदुद्दीनं ओवेसी आणि TRS याचा गड समजल्या जाणाऱ्या हैदराबादच्या निवडणुकीत प्रथमच फासे पलटले असून आता पहिल्याच टप्प्यात भाजपने मुसंडी मारली आहे.
भाजपकडून अमित शाह यांच्यापासून ते स्टार प्रचारक योगी आदित्यनाथ यांच्यापर्यंत अनेक नेत्यांनी कंबर कसली होती. हैदराबादमध्ये कमळ फुलवण्याचा निश्चय करत त्यांनी प्रचार केला आणि 2016च्या तुलनेत आता सध्याची स्थिती पाहता भाजप कमळ फुलवण्यात यशस्वी होणार असं दिसत आहे. हैदराबादचा गड राखणं भाजपसाठी का महत्त्वाचं आहे हे देखील जाणून घेणं तितकच महत्त्वाचं आहे.
नगरपालिका निवडणुकीत देशात पहिल्यांदाच भाजप इतक्या आक्रमक आणि पूर्ण तयारीनिशी उतरल्याचं पाहायला मिळालं. पण आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची ही तयारी असल्याची चर्चा आहे. 2023 रोजी तेलंगणा इथे विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकीला जरी वेळ असला तरी भाजपसाठी इथल्या 24 विधनसभेच्या जागा आणि 5 लोकसभेच्या जागा जिंकण्यासाठी आताची निवडणूक जिंकणं महत्त्वाचं आहे.
दक्षिण भारतात भाजपला आपलं कमळ फुलवण्याचं मोठं आव्हान आहे. अजूनही आंध्र प्रदेश, तमिळनाडू, तेलंगणा आणि केरळमध्ये भाजपला एकहाती विजय मिळवता आला नाही. त्यामुळे नगरपालिकेची ही निवडणूक जिंकून मजबूती देण्याचं नियोजन भाजप करत आहे.
TRSवर भ्रष्टाचार आणि वंशवादाचे आरोप असल्याची चर्चा आहे तर हैदराबाद हा AIMIMचा बालेकिल्ला असला तरी इतर ठिकाणी मात्र तसं वर्चस्व प्रस्थापित करण्यात ते अपयशी ठरले आहेत. अशा परिस्थितीचा फायदा भाजपने घेतला असून आता दक्षिण भारतात भाजपचं कमळ रुजवण्याचे जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत.
ओवेसी, TRS विरुद्ध भाजप लढाई
हैदराबाद महानगरपालिकेत एकूण 150 वॉर्ड आहेत. सत्ताधारी टीआरएस सर्व 150 वॉर्डांवर निवडणूक लढवत आहेत. भाजप 149 वॉर्ड, काँग्रेस 146 वॉर्डांवर टीडीपी 106, एमआयएम 51, सीपीआय 17, सीपीएम 12 आणि अन्य पक्ष 76 वॉर्डात लढत आहेत. 2016च्या निवडणुकीत भाजप 4 टीआरएस 3 तर एमआयएमने 44 जागावर विजय मिळवला होता. त्यामुळे आता ही निवडणूक अत्यंत चुरशीची आणि काँटे की टक्कर असणार आहे. या निवडणुकीत भाजपचं कमळ फुलणार का आणि एमआयएमला टक्कर देण्यात यशस्वी ठरणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amit Shah, Asaduddin owaisi, BJP