नवी दिल्ली, 1 जून : नवरा-बायकोमध्ये भांडणं (Husband-wife quarrel) होणं ही बाब सामान्य आहे. भांडणांमध्येही प्रेम असतं असं म्हटलं जातं. कोरोना काळात लागू झालेल्या लॉकडाऊनने सर्वांना घरात राहण्यास भाग पाडलं. यामुळे आपल्या कामात नेहमी व्यग्र असणार्या पती-पत्नींना एकमेकांसाठी वेळ देता येईल असं अनेकांना वाटत होतं. तशा पद्धतीनं काही जोडप्यांना या लॉकडाऊनचा फायदाही झाला. मात्र, काही जोडप्यांच्या नात्यात या काळात मोठी दरी सुद्धा निर्माण झाली.
कोरोनाच्या संकटादरम्यान काही पती-पत्नींमध्ये एकमेकांना देण्यासाठी वेळ मिळाला, असं म्हणण्याऐवजी वेगवेगळ्या मुद्द्यांवर भांडण्यासाठी वेळ मिळाला, असं म्हणण्यासारखी अशी परिस्थिती झाली. यामुळं काही नात्यांमध्ये भांडणाची संख्या इतकी वाढली की, त्यांना न्यायालयापर्यंत जाण्याची वेळ आली. अशा विकोपाला गेलेल्या प्रकरणांची आकडेवारी या काळात वाढली आहे. पती-पत्नी एकमेकांसाठी कोरोनापेक्षाही भयंकर ठरल्याचं चित्र काही नात्यांमध्ये निर्माण झालंय.
कोरोना फैलाव रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनमधील कडक नियमावलीमुळं अनेक लग्नाळू मुला-मुलींची लग्न पुढे ढकलण्याचा किंवा रखडल्याचा मुद्दाही एका बाजूला आहे. त्यासोबतच आता दुसऱ्या बाजूला झालेली लग्न मोडण्याचा मुद्दाही गंभीर बनतोय.
मध्य प्रदेशात एप्रिलमध्ये महिलांकडून ऊर्जा महिला हेल्प डेस्कवर 7670 तक्रारी दाखल झाल्यात. यापैकी बहुतेक तक्रारी पती-पत्नींमध्ये आपापसांत झालेल्या भांडणांच्या आहेत. काही प्रकरणांमध्ये पोलिसातही तक्रारी दाखल झाल्या आहेत. काही घटनांमध्ये समुपदेशनदेखील सुरू आहे.
हे वाचा - कसं, कुणी आणि कधी घ्यावं 2DG? कोरोना औषधाबाबत जरूर वाचा DRDO च्या मार्गदर्शक सूचना
अनेक पोलीस ठाण्यांमध्ये महिला सुरक्षा आणि त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी ऊर्जा महिला हेल्पडेस्क सुरू करण्यात आला होता. या डेस्कवरती एप्रिलमध्ये दाखल झालेल्या तक्रारींच्या आकड्यांवर अनेकांचा विश्वास बसत नाहीये. अतिरिक्त पोलीस अधीक्षक राजेंद्रसिंह म्हणाले की, इथल्या पोलीस ठाण्यांमध्ये एप्रिल महिन्यात 700 ऊर्जा डेस्क सुरू झाले.
एप्रिलमध्ये 7500हून अधिक तक्रारी
अतिरिक्त पोलीस अधीक्षक भदौरिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिलमध्ये 7670 तक्रारी मिळाल्या, यापैकी 2386 प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल झाले. पती-पत्नी दरम्यान मानसिक त्रासाच्या 1007 तक्रारी आल्या आहेत. डीआयजी यांनीही एप्रिलमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटे दरम्यान घरगुती भांडणांचं प्रमाण वाढलेलं असल्याचं सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Relationship, Wife, Wife and husband