फिरोजाबाद, 10 डिसेंबर : 2020 हे वर्ष संपूर्ण जगासाठी खूपच त्रासदायक ठरलं आहे. या वर्षात आलेल्या कोरोना साथीमुळे (Corona Pendemic) अनेकांनी आपली जीवाभावाची माणसं गमावली आहेत. अशीच एक दुःखद घटना उत्तर प्रदेशात (UP) घडली आहे. उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद (Firozabad) येथील एका जोडप्याचा संसार अवघा चार दिवस टिकला. सात जन्म सोबत राहण्याची शपथ घेऊन सुरू केलेला संसार अवघ्या चारच दिवसात मोडवा लागला आहे. दहा दिवसांपूर्वी या दोघांच लग्न झालं होतं. त्यामुळे नातेवाईकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
फिरोजाबाद मधील या कुटुंबातील नऊ जणांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचं समोर आलं आहे. यामध्ये वधू देखील कोरोना संक्रमित आहे. संसर्ग ग्रस्त लोकांवर उपचार केले जात आहेत. 10 दिवसांपूर्वीच दोघांचे लग्न झाले होते आणि लग्नानंतर 4 डिसेंबर रोजी वराचा मृत्यू झाला आहे.
4 डिसेंबर रोजी जेव्हा वराचा मृत्यू झाला, तेव्हा त्याला ताप आणि श्वास घेण्यास त्रास होत होता. परंतु त्याची कोरोना टेस्ट करण्यात आली नव्हती. यानंतर कोरोना संसर्ग झाला असेल या संशयावरून कुटुंबाने जेव्हा कोरोना तपासणी केली, त्यामध्ये एकाच कुटुंबातील नऊ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे.
मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता कुलश्रेष्ठ यांच्या मते, या युवकाचे 25 नोव्हेंबर रोजी लग्न झाले होते. लग्नानंतर लगेचच या तरूणाची तब्येत बिघडली आणि 4 डिसेंबरला त्याचा मृत्यू झाला. कोरोना चाचणीत वधूसह 9 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं आढळलं आहे. यामध्ये वधूच्या सासूचा देखील समावेश आहे. या सर्वांवर सध्या उपचार सुरू आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Uttar pradesh