काश्मीरच्या पहिल्या महिला फुटबाॅलपटूचा थरारक प्रवास

आज ती भारताची जर्सी घालून खेळते. ही आहे 23 वर्षांची अफ्शां आशिक. ती काश्मीरची फुटबाॅलर मानली जाते. वाचा तिची कहाणी तिच्याच शब्दात.

News18 Lokmat | Updated On: Mar 15, 2019 04:05 PM IST

काश्मीरच्या पहिल्या महिला फुटबाॅलपटूचा थरारक प्रवास

मुंबई, 15 मार्च : ती जेव्हा फुटबाॅलच्या मैदानात पोचते, तेव्हा सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे वळतात. एवढ्या सगळ्या मुलांमध्ये एकटी मुलगी? त्या काळात काश्मीरमध्ये मुलीनं फुटबाॅल खेळणं एक आश्चर्यच होतं. घरातून ती गुपचूप निघायची. वडिलांनी थांबवलं, तिला मारझोड केली. आज ती भारताची जर्सी घालून खेळते. ही आहे 23 वर्षांची अफ्शां आशिक. ती काश्मीरची फुटबाॅलर मानली जाते. वाचा तिची कहाणी तिच्याच शब्दात.

काश्मीरमध्ये मुली जे काही थोडंफार खेळू शकत होत्या, ते म्हणजे क्रिकेट. मी पण क्रिकेट खेळायचे. पण सगळं लक्ष होतं फुटबाॅलवर. घरी प्रचंड विरोध. मी पुन्हा क्रिकेटकडेच वळले. पण फुटबाॅल खेळण्याची इच्छा काही गप्प बसू देईना. मग ठरवलं, खेळून तर बघू. मग जे होईल ते.

मी हट्टालाच पेटले. पण मला फुटबाॅल शिकवणार कोण? सुरुवातीला माझ्या बरोबर शिकणाऱ्या मुलींना माझ्या बरोबर सराव करायची विनंती केली. पण कोणीही तयार झालं नाही. मग मी एकटीनंच खेळायचं ठरवलं. फुटबाॅल कोचकडे गेले. सुरुवातीचे दिवस फारच कठीण होते. घरी फुटबाॅल खेळायची बंदी. सकाळी अंधारात मी घराबाहेर पडायचे आणि वडील जागे होण्याच्या आत परतायचे.


मला दोन ठिकाणी स्वत:ला सिद्ध करायचं होतं. एक होतं माझं घर. त्यांना एक दिवस कळलं. मग माझ्यावर निर्बंध टाकणं सुरू झालं. घरातून बाहेर पडू द्यायचे नाहीत. मी पहाटे घराबाहेर पडायचे. परत आले की पुन्हा तीच आरडाओरड सुरू व्हायची. डॅडींनी तर मला मारझोडही केली. पण मी खेळतच राहिले.

Loading...

फुटबाॅल असा खेळ आहे, ज्यात दुखापत होण्याच्या शक्यता जास्त असतात. मग माझं लग्न कसं होणार, या विचारामुळे वडिलांना फुटबाॅल खेळणं पसंत नव्हतं. म्हणून आजही काश्मिरी मुलींना फुटबाॅल खेळायची परवानगी मिळत नाही.


दुसरी जागा होती खेळाचं मैदान.तिथे मला स्वत:ला सिद्ध करायचं होतं. मुली तर नव्हत्याच. मग कोचनं मुलांबरोबर ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली. मुलं बाॅल हळू फेकायचे, म्हणजे मला दुखापत होऊ नये म्हणून. एक दिवस मला कोचनं गोलपोस्टकडे उभं केलं. मुलांना गोल करायला सांगितला. ती 6 मुलं होती. कुणीही गोल करू शकत नव्हतं. एरवी ते चांगलं खेळायचे. कोच त्यांना ओरडले. तेव्हा गोलकीपर मुलगी असल्यानं मुलं घाबरत होती. हळूहळू त्यांची भीती संपली. मीही तयार व्हायला लागले. मी कीपिंग करायला लागले.

मी पहिल्यांदा सगळ्यांसमोर आले ते वेगळ्या कारणानं. एकदा काॅलेजच्या फ्रेंड्ससोबत मी पोलिसांवर दगडफेक केली होती. अचानक मी पोस्टक गर्ल बनले. खरं तर ती घटना क्षणिक होती. पण लोक मला दगडफेक करणारी फुटबाॅलपटू म्हणून ओळखू लागले. तो रागही क्षणभरापुरता होता. मला नाही वाटत लोकांनी मला असं ओळखावं. मला त्यांनी माझ्या खेळामुळे ओळखावं.

आज मी इंडियन विमन्स लीगतर्फे खेळते. मुलींना फुटबाॅलचं ट्रेनिंग देते. मुंबईच्या एका क्लबतर्फे खेळते. पण जेव्हा मी भारताची जर्सी घालते तेव्हा आजही अंगावर रोमांच उभे राहतात.


VIDEO: युती म्हणजे फेव्हिकॉलचा मजबूत जोड है टूटेगा नाही- मुख्यमंत्री

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 15, 2019 04:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...