News18 Lokmat

वादळांना नावं कशी दिली जातात? 'ओखी'चा नेमका अर्थ काय?

वादळाचं बारसे करण्यासाठी काही आंतरराष्ट्रीय संकेत सुद्धा आहेत. वादळांचं बारसं करण्याची काही महत्त्वाची कारणं आहेत.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Dec 5, 2017 07:55 PM IST

वादळांना नावं कशी दिली जातात? 'ओखी'चा नेमका अर्थ काय?

05 डिसेंबर : समुद्रात चक्रीवादळ निर्माण झालं की हवामान खात्याकडून त्याचं नामकरण केलं जातं. वादळांची ही चमत्कारिक नावं देण्याचा प्रघात तसा जुनाच म्हणजे, गेल्या शतकभरातला आहे. यातली गंमतीची बाब म्हणजे, वादळाचं बारसे करण्यासाठी काही आंतरराष्ट्रीय संकेत सुद्धा आहेत. वादळांचं बारसं करण्याची काही महत्त्वाची कारणं आहेत.

वादळ पुढे सरकताना देशादेशात माहितीची देवाणघेवाण होते. देवाणघेवाणी होत असताना एकाच वादळाला जर विविध नावाने संबोधले गेले तर घोळ निर्माण होऊ शकतो. अफवांना देखील ऊत येऊ शकतो.

हे सगळं टाळण्यासाठी वादळ निर्माण होणार्‍या व त्याच्या प्रभावाखाली येणार्‍या भौगोलिक प्रदेशातील देश मिळून एखाद्या सांकेतिक नावाचा वापर करतात. त्याबद्दलही काही नियम आहेत.

ताशी 65 किमीपेक्षा अधिक वेगाच्या चक्रीवादळाचं नामकरण होतं. वादळांना नाव देण्याची पाश्चिमात्य देशांकडून सुरुवात झाली. अमेरिकेकडून चक्रीवादळांना महिलांची नावं दिली जातात. प्रादेशिक वैशिष्ट्यांची नावं देण्याचाही विचार असतो.नावं देताना कुणाच्या भावना न दुखवण्याची सूचना असते.

एखाद्या वादळाचा परिणाम कित्येक देशांना भोगावा लागतो. तेव्हा हे एकाच देशाचं न राहता, वादळ निर्मितीस कारणीभूत असलेल्या महासागरीय प्रदेशांच्या झोननुसार असावं असं ठरलं.. महासागरानुसार काही झोन पाडण्यात आले.भारत नॉर्थ इंडियन ओशनिक झोनमध्ये येतो. त्यात्या झोनमधील देशानी नावं सुचवायची आणि जसजशी चक्रीवादळं येत जातील तसतशी अनुक्रमे येणाऱ्या वादळांना द्यायची हा नियम आहे. भारतानं २००४ सालात उत्तर हिंदी महासागरात येणार्‍या वादळांना नावं देण्याची परंपरा सुरु झाली. भारताच्या भौगोलिक अथवा सागरी क्षेत्रात निर्माण होणार्‍या चक्रीवादळांना नावं देताना भारतीय हवामान खातं भारतीय उपखंडातल्या इतर देशांच्या वेधशाळांशी संपर्क करतं. भारताच्या झोनमध्ये ओमान, पाकिस्तान, मालदीव, श्रीलंका, बांग्लादेश, म्यानमार, थायलँड हे देश आहेत. यांच्याशी संपर्क करून सर्वांच्या संमतीनं एखादं नाव निश्चित केलं जातं.

Loading...

वादळाचे नाव ‘ओखी’ कसे पडले?

‘ओखी’ या बंगाली भाषेतील शब्दाचा अर्थ डोळा असा आहे. बांग्लादेशने या चक्रीवादळाला ‘ओखी’ हे नाव दिले आहे.

फयान वादळाचं नाव म्यानमारनं दिलं...

हुधुध ओमानं सुचवलं...

निलोफर पाकिस्ताननं सांगितलं...

नानौक बांगलादेशचं होतं

अनेक राष्ट्र नावं निवडताना प्रख्यात अभिनेते अभिनेत्री, त्या देशातील काही सुप्रसिद्ध अथवा बदनाम व्यक्तींची नावंही वापरतात. सर्वसामान्यपणे वादळांची विध्वंसक शक्ती त्यांचं बारसं करताना लक्षात घेतली जाते. त्यामुळे चक्रिवादळांच्या नावात काय आहे असं कुणी विचारलं तर त्यांना हा वादळनामा नक्की सांगा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 5, 2017 07:32 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...