नवी दिल्ली, 17 ऑक्टोबर : बिहारमध्ये होत असलेली विधानसभा निवडणूक सध्या देशाचं लक्ष वेधून घेत आहे. कारण या निवडणुकीत भाजप-जेडीयू यांची युती विरुद्ध आरजेडी-काँग्रेस यांच्या महाआघाडीमध्ये 'काँटे की टक्कर' पाहायला मिळत आहे. विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वात लढत असलेल्या एनडीएला पुन्हा सत्ता काबीज करण्याचा विश्वास आहे, तर तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीने सत्ताबदलासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. या निवडणूक स्थितीबाबत भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाष्य करत जागांबाबत दावा केला आहे.
'न्यूज18'ला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत अमित शहा म्हणाले की, 'आम्ही आधीच ठरवलं आहे की ही निवडणूक नितीश कुमार यांच्याच नेतृत्वात लढवली जाईल. मी अफवांना पूर्णविराम देत सांगू इच्छितो की निवडणुकीनंतर नितीश कुमारच मुख्यमंत्री होतील. जेडीयूपेक्षा भाजपने अधिक जागा जिंकल्या तरीही नितीश कुमार हेच मुख्यमंत्री होतील. काही वचनं की सार्वजनिकरित्या दिली जातात आणि त्यांचं पालन केलं जातं.'
भाजपला किती जागा मिळतील?
'एनडीएची स्थापना झाल्यापासून नितीश कुमार आमचे साथीदार आहेत. फक्त पक्षाचा विस्तार करायचा म्हणून स्वतंत्र लढणं योग्य नाही. आघाडी धर्म आहे, केंद्रात मोदीजी आणि राज्यात नितीश जी...असं डबल इंजिन सरकार बिहारच्या विकास करत आहे. निवडणुकीत आम्हाला दोन तृतीयांश बहुमत मिळेल,' असा दावा अमित शहा यांनी केला आहे.
चिराग पासवान यांच्याबद्दल काय आहे भूमिका?
'चिराग पासवान म्हणतात की मोदी त्यांच्या ह्रदयात आहेत, तर मग ते तुमच्यासोबत का नाहीत', असा प्रश्न न्यूज18चे संपादक राहुल जोशी यांनी अमित शहा यांना विचारला. त्यावर उत्तर देताना अमित शहा यांनी पासवान यांच्याबाबत निवडणुकीत भाजपची काय भूमिका असेल हे स्पष्ट केलं. 'रामविलासजी यांचं निधन झालं. आम्ही चिराग यांच्यासोबत अनेकदा बोललो. मी स्वत: त्यांच्याशी संवाद साधला होता. मात्र त्यांनी अशी काही वक्तव्य केली ज्याची प्रतिक्रिया भाजप आणि जेडीयू कार्यकर्त्यांमध्ये उमटली. निवडणुकीनंतर ते सोबत येतील की नाही हे नंतर पाहू,' असं अमित शहा म्हणाले.