Home /News /national /

कशी ठरते LPG ची किंमत? जाणून घ्या सिलिंडरच्या वाढत्या दरामागची कारणं...

कशी ठरते LPG ची किंमत? जाणून घ्या सिलिंडरच्या वाढत्या दरामागची कारणं...

वाढत्या महागाईचा (Rising Inflation) फटका सर्व स्तरांमधल्या नागरिकांना कोणत्या ना कोणत्या प्रकारे बसतोच. सामान्य माणसाची तर महागाईमुळे फार बिकट अवस्था होते. घरगुती वापराच्या गॅसच्या (LPG Gas Cylinder) किमतीदेखील दिवसेंदिवस वाढतच आहेत.

पुढे वाचा ...
मुंबई, 20 मे : वाढत्या महागाईचा (Rising Inflation) फटका सर्व स्तरांमधल्या नागरिकांना कोणत्या ना कोणत्या प्रकारे बसतोच. सामान्य माणसाची तर महागाईमुळे फार बिकट अवस्था होते. कोरोनानंतर महागाईने कळस गाठला आहे. पेट्रोलच्या वाढत्या किमती, खाद्यतेलाच्या किमतींमध्ये झालेली वाढ याने नागरिकांचं दैनंदिन आयुष्य मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झालं आहे. त्याचप्रमाणे घरगुती वापराच्या गॅसच्या (LPG Gas Cylinder) किमतीदेखील दिवसेंदिवस वाढतच आहेत. या महिन्यात सलग दोनदा सिलिंडरच्या किमतींमध्ये वाढ झाली. 7 मे रोजी सिलिंडर पन्नास रुपयांनी महागला. त्यानंतर गुरुवारी (19 मे 2022) झालेली वाढ 3.50 रुपये एवढी आहे. आता दिल्लीमध्ये सबसिडी नसलेल्या 14.2 किलोग्रॅम गॅस सिलिंडरची किंमत 1003 रुपये झाली आहे. एप्रिल 2021 पासून ते आतापर्यंत गॅस सिलिंडरच्या किमतींमध्ये 193.5 रुपये एवढी वाढ झाली आहे. गॅस सिलिंडरची किंमत नेमकी ठरते कशी आणि दिवसेंदिवस गॅस सिलिंडर महाग का होत चालले आहेत, याबद्दल अनेकांना कुतुहल असतं. त्याबद्दलची माहिती थोडक्यात घेऊ या. भारतात एलपीजी सिलिंडरची किंमत ठरवण्यासाठी दोन घटक प्रामुख्याने जबाबदार आहेत. पहिला घटक म्हणजे, डॉलरच्या तुलनेत रुपयाचा विनिमय दर (Money Exchange Rate) आणि दुसरा घटक म्हणजे आंतरराष्ट्रीय बेंचमार्क रेट (International Benchmark Rate). जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात एलपीजीची किंमत वाढते आणि रुपया कमजोर पडतो, तेव्हा देशांतर्गत बाजारात एलपीजीची किंमत वाढते. सध्या सिलिंडरच्या किमती वाढण्यास हे दोन्ही घटक जबाबदार आहेत. डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरूच आहे आणि बेंचमार्क रेटदेखील वाईट अवस्थेत आहे. गेल्या अनेक आठवड्यांपासून रुपयाची स्थिती बिकट झाली आहे. विशेषत: तेलाच्या किमती वाढल्यानंतर त्यात आणखी घसरण होत आहे. बुधवारचा (18 मे 2022) रेकॉर्ड पाहता, रुपया 17 पैशांनी घसरून 77.61 प्रति डॉलर या नवीन नीचांकी पातळीवर थांबला होता. घरगुती गॅसचा कच्चा माल क्रूड ऑइल हा आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीवरून एलपीजीची किंमत ठरवली जाते. क्रूडचे भाव आता विक्रमी उच्चांकावर पोहोचले आहेत. बुधवारी (18 मे 2022) ब्रेंट क्रूडचे दर 1.61 टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल 110.87 डॉलर्सपर्यंत पोहोचले. यामध्ये सातत्याने वाढ होत असून त्यामुळे गॅसचे दरही वाढत आहेत. अशी ठरवली जाते घरगुती गॅस सिलिंडरची किंमत.... भारतात एलपीजी सिलिंडरची किंमत प्रामुख्याने 'इम्पोर्ट पॅरिटी प्राइस' किंवा आयपीपी (Import Parity Price Or IPP) या सूत्रानुसार ठरवली जाते. हा IPP आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतल्या LPG च्या किमतीनुसार ठरवला जातो. कारण भारतातला बहुतांश गॅस पुरवठा आयातीवर अवलंबून असतो. भारतातला IPP चा बेंचमार्क सौदी अरामकोची LPG किंमत असते. म्हणजेच, सौदी अरामको या जगातल्या सर्वांत मोठ्या तेल कंपनीच्या एलपीजी किमतीच्या आधारे देशांतर्गत बाजारातले एलपीजीचे दर ठरवले जातात. याशिवाय एफओबी (Free On Board), समुद्रमार्गे होणारं शिपिंग, विमा, कस्टम ड्युटी, बंदर थकबाकी हे घटकदेखील किमती ठरवण्यास कारणीभूत ठरतात. या सर्व किंमती डॉलर्समध्ये कोट केल्या जातात आणि त्यानंतर त्याचं रूपांतर रुपयांमध्ये होतं. सध्या डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत होत असल्याने एलपीजीचे दर पूर्वीपेक्षा जास्त झाले आहेत. या सर्व बाबींव्यतिरिक्त, गॅस सिलिंडरची देशांतर्गत वाहतूक, मार्केटिंग खर्च, तेल कंपन्यांचं मार्जिन शुल्क, बॉटलिंग चार्जेस, डीलर्सचं कमिशन आणि जीएसटी हे सगळं मिळून सिलिंडरची किंमत ठरते. या वर्षी मार्चमध्ये सौदी आरामकोने एलपीजीची किंमत 769.1 डॉलर्स प्रति मेट्रिक टन ठेवली होती. जानेवारीच्या तुलनेत ही किंमत सुमारे 6 टक्के अधिक आहे. नोव्हेंबर 2020 च्या तुलनेत गॅसच्या किमतीत 104 टक्के वाढ करण्यात आली आहे. त्या वेळी एलपीजीचा दर 376.3 प्रति मेट्रिक टन होता. तो आता प्रति मेट्रिक टन 769.1 डॉलर्सवर पोहोचला आहे. कच्च्या तेलाचीही तीच स्थिती आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये त्याचा दर प्रति बॅरल 41 डॉलर्स होता. तो मार्च 2022 मध्ये 115.4 डॉलर्सवर पोहोचला. दिवसेंदिवस का वाढत आहेत घरगुती गॅसच्या किमती... घरगुती गॅस सिलिंडरची किंमत कच्च्या तेलावर आधारित आहे आणि ब्रेंट क्रूड तेलाची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात 110 डॉलर्सवर पोहोचली आहे. युक्रेन युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे गॅसच्या दरातही सातत्याने वाढ होत आहे. नोव्हेंबर 2020 पासून एलपीजीच्या किमतीत वाढ दिसून येत आहे. तेव्हा जग कोरोनाच्या प्रभावातून बाहेर येत होतं. त्यानंतर तेल आणि वायूच्या मागणीत मोठी वाढ झाली; मात्र कंपन्यांनी मागणीनुसार पुरवठा पूर्ववत केला नाही. त्यामुळे जगभरात कृत्रिम टंचाई निर्माण झाली. हे सर्व सुरू असताना या वर्षी फेब्रुवारीमध्ये रशिया-युक्रेन युद्ध सुरू झालं. रशियातून जगाला पुरवला जाणारा वायू आणि तेलाच्या मालावर याचा मोठा परिणाम झाला. रशिया आणि युक्रेनचं हे युद्ध महागाईचा भडका उडण्यास मोठं कारण ठरलं.
First published:

Tags: LPG Price

पुढील बातम्या