मराठी बातम्या /बातम्या /देश /

मान्सून देशात दाखल झालाय हे कसं समजतं; जाणून घेऊया मान्सून आगमनाच्या अंदाजा विषयी

मान्सून देशात दाखल झालाय हे कसं समजतं; जाणून घेऊया मान्सून आगमनाच्या अंदाजा विषयी

 मान्सूनच्या या तारखा कशा निश्चित होतात आणि भारतात मान्सूनला इतके महत्व का आहे, जाणून घेऊया...

मान्सूनच्या या तारखा कशा निश्चित होतात आणि भारतात मान्सूनला इतके महत्व का आहे, जाणून घेऊया...

मान्सूनच्या या तारखा कशा निश्चित होतात आणि भारतात मान्सूनला इतके महत्व का आहे, जाणून घेऊया...

  • Published by:  Meenal Gangurde

नवी दिल्ली, 5 जून :  नैऋत्य मौसमी वारे अर्थात मान्सून (Monsoon) दरवर्षी 1 जूनला देवभूमी केरळमध्ये (Kerala) दाखल होतो. देशातील मान्सूनची वाटचाल केरळमधून सुरु होते. परंतु, यंदा मान्सून केरळमध्ये दोन दिवस उशीरा येण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवला होता. देशातील बहुतांश भागात यंदा मान्सून सामान्य (Normal Monsoon) राहिल असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. मान्सूनच्या या तारखा कशा निश्चित होतात आणि भारतात मान्सूनला इतके महत्व का आहे, जाणून घेऊया...

या महिन्याच्या सुरुवातीला भारतीय हवामान विभाग (IMD) आणि खासगी हवामान संस्था स्कायमेट (Skymet) यांनी 2021 मधील मान्सून हंगाम प्रारंभासंदर्भात वेगवेगळ्या तारखा जाहीर केल्या होत्या. यावेळी भारतीय हवामान विभागाने मान्सूनचे आगमन यंदा काही दिवस उशीराने होईल तर स्कायमेटने मान्सूनचे आगमन झाल्याचे जाहीर केले होते. मात्र या विषयांवर दोघांमध्ये मतभेद होण्याची ही काही पहिली वेळ नव्हे. मान्सूनचे आगमन निश्चित कधी होईल, हे जाहीर करण्यासाठी आयएमडीकडे चेकलिस्ट (Checklist) असते. नैऋत्य मान्सून देश व्यापण्यापूर्वी केरळात कधी दाखल होईल, तसेच मान्सूनच्या वाटचालीची स्थिती दर्शवण्यासाठी तशी लोकेशन (Location) दिली जातात. मान्सून दाखल झाला आहे, हे जाहीर करण्यापूर्वी आयएमडी संबंधित भागात किती प्रमाणात पाऊस झाला आहे, हे तपासते. जर 14 नियुक्त हवामान स्थानकांपैकी 60 टक्के ठिकाणी 10 मे नंतर सलग 2 दिवस 2.5 मिमी किंवा त्यापेक्षा अधिक पावसाची नोंद झाली तर त्याच्या दुसऱ्या दिवशी केरळात मान्सून दाखल झाल्याचे जाहीर केले जाते. मात्र यासह आणखीन काही निकष आहेत ते जुळणे आवश्यक असल्याचे आयएमडीने सांगितले. यामध्ये प्रदेशामधील पश्चिमी दिशेच्या वाऱ्याची खोली आणि पृथ्वीवरुन उत्सर्जित होणाऱ्या रेडीएशनचा समावेश असतो.

यंदा मान्सूनला उशीर का झालाहे नेहमीच घडू शकतं का?

मान्सून दाखल होण्याची सर्वसाधारण तारीख 1 जून असून यंदा त्यापूर्वी म्हणजेच 31 मे रोजी मान्सून केरळात दाखल होईल, असा अंदाज आयएमडीने वर्तवला होता. परंतु, कर्नाटक किनारपट्टीवर चक्रीवादळाची (Cyclonic Circulation) स्थिती निर्माण झाल्याने या प्रक्रियेवर काहीसा परिणाम झाला. आयएमडी 2005 पासून केरळात मान्सूनच्या आगमनाबाबत ऑपरेशन पूर्वानुमान देत असून त्यात 4 दिवस मागे किंवा पुढे आगमन होईल असे गृहित धरले जाते. 2005 ते 2020 या 16 वर्षांच्या कालावधीत 2015 वगळता अन्य सर्व वर्षांचे अंदाज अचूक आणि बरोबर आले असल्याचे हवामान विभागाने सांगितले.

हे ही वाचा-कोरोनामुळं भारतात अडकलेल्या विदेशी नागरिकांच्या व्हिसामध्ये 31 ऑगस्टपर्यंत वाढ

मान्सूनचे आगमन उशीरा झाले म्हणजे देशातील अन्य भागातील पावसावर त्याचा परिणाम होईल, असे नाही. 2016 मध्ये केरळमध्ये मान्सूनचे आगमन 8 जूनला झाले होते. परंतु 13 जुलैपर्यंत मान्सूनने सर्व देश व्यापला होता.

सामान्य मान्सून म्हणजे काय?

मान्सून कालावधीत जर पाऊस दिर्घकालीन सरासरीच्या (LPA) तुलनेत 96 ते 104 टक्के बरसला तर त्यास सामान्य मान्सून असं म्हणतात. एलपीए म्हणजे देशभरातील पावसाचा 1961 ते 2010 दरम्यानचा सरासरी डेटा असून त्यानुसार या कालावधीतील पावसाची सरासरी 88 सेंटीमीटर आहे. 2021 मध्ये मान्सून स्थिती सामान्य असेल म्हणजेच जून ते सप्टेंबर दरम्यानच्या एलपीएनुसार एकूण 101 टक्के पाऊस होईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली असून, यात 4 टक्के प्रमाण हे कमी किंवा अधिक गृहित धरण्यात आले आहे. परंतु, यात प्रादेशिक फरक देखील अपेक्षित आहे. अंदाजानुसार वायव्य भारतात मान्सून स्थिती सामान्य राहिल या भागात 92 ते 108 टक्के पावसाची शक्यता आहे. दक्षिण व्दिपकल्प भागात 93 ते 107 टक्के आणि ईशान्य भारतात सामान्य पेक्षा कमी म्हणजेच 95 टक्क्यांपेक्षा थोडा अधिक पाऊस होईल. मध्य भारतात सामान्यपेक्षा थोडा अधिक म्हणजेच 106 टक्क्यांपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे. देशातील बहुतांश भागात सामान्य ते सामान्यपेक्षा अधिक पाऊस होईल, अशी अपेक्षा आहे. विशेषतः कृषीसाठी महत्वपूर्ण असलेल्या प्रदेशांमध्ये एलपीएच्या तुलनेत 106 टक्के पावसाचा अंदाज आहे.

भारतासाठी मान्सून हा अधिक महत्वाचा घटक का आहे?

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, भारतात 70 टक्के पाऊस हा मान्सूनवर अवलंबून आहे. तसेच तांदूळ, गहू, ऊस आदी महत्वाच्या पिकांसह देशभरातील अन्य पिकांचे (Crops) भवितव्य हे पावसावर अवलंबून असते. भारतात जीडीपीमध्ये 15 टक्के म्हणजेच 2 लाख कोटी रुपयांचा वाटा हा कृषी क्षेत्राचा (Agriculture Sector) आहे. तसेच देशातील निम्म्याहून अधिक कामगार शक्ती या क्षेत्रात कार्यरत आहे. त्यामुळे मान्सूनबाबत निराशा करणारी एक बातमी देखील या क्षेत्रातील लोक आणि बाजारावर निराशेचे सावट आणते. पुरेसा आणि वेळेवर मान्सून बरसला तर पीक उत्पादनात अपेक्षित वाढ होते. शेती उत्पादनास चालना मिळते. परिणामी शेतकऱ्यांच्या हातात दोन पैसे येतात आणि ग्रामीण भागातून मागणी वाढते.

First published:

Tags: Monsoon, Rain