नवी दिल्ली, 10 ऑगस्ट: काँग्रेस नेते (INC) कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी सोमवारी आपल्या तीन मूर्ती लेन निवासस्थानी आयोजित केलेल्या डिनर पार्टीमध्ये (Dinner Party) जवळपास एक डझनहून अधिक विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी हजेरी लावली आहे. यावेळी त्यांनी विरोधी पक्षांनी एकत्र येण्याबाबत आणि भारतीय जनता पार्टीला (BJP) 2022 मधील उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका (Uttar Pradesh Assembly Election) आणि 2024 साली होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये पराभूत करण्याबाबत चर्चा केली आहे. सिब्बल यांनी सोमवारी या डिनरचं आयोजन केलं होतं, ज्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना संघटनात्मक सुधारणांसाठी पत्र लिहिणारे 'जी -23' चे जवळपास सर्व सदस्य उपस्थित होते.
डिनरसाठी हजेरी लावलेल्या एका विरोधी पक्षाच्या नेत्यानं सांगितलं की, "एकता आणखी बळकटीसाठी अशा आणखी बैठका आयोजित केल्या पाहिजेत." आम्हाला आधी उत्तर प्रदेशात 2022 मध्ये आणि नंतर 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये भाजपाला पराभूत करायचं आहे. राजदचे लालू प्रसाद यादव, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव आणि राम गोपाल यादव, माकपचे सीताराम येचुरी, भाकप (भारतीय कम्युनिस्ट पार्टी) चे डी. राजा, नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम आदी वरिष्ठ नेते या डिनरसाठी उपस्थित होते.
हेही वाचा-पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली UN Security Council ची बैठक
याशिवाय शिवसेनेचे खासदार संजय राऊत, आम आदमी पार्टीचे संजय सिंह, तृणमूल काँग्रेसचे नेते कल्याण बॅनर्जी आणि डेरेक ओ ब्रायन, बिजू जनता दलाचे नेते पिनाकी मिश्रा आणि अमर पटनायक, द्रमुक (द्रविड मुनेत्र कळघम) तिरुची शिवा आणि टीके एलनगोवन, रालोदचे (राष्ट्रीय लोकदल) चे जयंत चौधरी आणि टीआरएस (तेलंगणा राष्ट्र समिती) चे नेतेही या डिनरला उपस्थित होते. या डिनरमध्ये अकाली दलाचे नेते नरेश गुजराल देखील उपस्थित असल्याचं सांगण्यात आलं आहे. सिब्बल यांच्या या डिनरमध्ये YSRCP आणि TDP चे नेतेही उपस्थित होते.
हेही वाचा-स्वा. सावरकरांचं 'हिंदूराष्ट्र' काँग्रेसला मान्य? VIDEO नंतर पक्षात खळबळ
तसेच सिब्बल यांनी आयोजित केलेल्या या डिनरमध्ये सहभागी झालेल्या G-23 नेत्यांमध्ये गुलाम नबी आझाद, भूपिंदर सिंग हुड्डा, आनंद शर्मा, मुकुल वासनिक, पृथ्वीराज चव्हाण, मनीष तिवारी आणि शशी थरूर सहभागी होते. G-23 काँग्रेस नेत्यांची अशी पहिल्यांदाच विरोधी पक्षाच्या नेत्यांसोबत बैठक झाली आहे. सूत्रांनी सांगितलं की, कपिल सिब्बल यांच्या सुरुवातीच्या मनोगतानंतर सर्व नेत्यांची उत्तर प्रदेशातील 2022 सालच्या विधानसभा निवडणुका आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा केली. संबंधित निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी एकत्र यावं लागेल, याबाबतही चर्चा झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.