Home /News /national /

आजीच्या पावलावर पाऊल, आजीनंही उलथवून टाकलं होतं काँग्रेस सरकार

आजीच्या पावलावर पाऊल, आजीनंही उलथवून टाकलं होतं काँग्रेस सरकार

सिंधिया घराणं आणि मध्यप्रदेशचं राजकारण...

    भोपाळ, 11 मार्च: मध्यप्रदेशमधल्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरु आहे. 43 वर्षांपूर्वी ज्योतिरादित्य यांच्या आजी राजमाता विजयाराजे सिंधिया यांनीही काँग्रेसचं डीपी मिश्रा सरकार उलथवून टाकलं होतं. आजीच्या पावलावर पाऊल ठेवून नातवानंही सत्ताकारणात मोठं पाऊल उचललं आहे. राजमाता विजयाराजेंनी जनसंघाच्या आमदारांच्या पाठिंब्याच्या जोरावर गोविंद नारायण सिंह यांना मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान केलं होतं. या सत्तातरांपासूनच मध्य प्रदेशवासीयांच्या मनात ग्वाल्हेरच्या सिंधिया राजघराण्याचं स्थान अधिक बळकट झालं. देश स्वतंत्र होईपर्यंत ग्वाल्हेर संस्थान सिंधिया घराण्याच्या अधिपत्याखाली होतं. राज्याची जबाबदारी राजे जिवाजीराव सिंधियांच्या खांद्यावर होती. स्वातंत्र्यानंतर ग्वाल्हेर संस्थान विलीन झालं. तेव्हा जिवाजीराव यांना भारत सरकारनं मध्य भारताच्या राज्य प्रमुखाचं पद बहाल केलं. 1956 साली मध्य प्रदेशमध्ये विलीन होईपर्यंत जिवाजीराव त्या पदावर होते. 1961 मध्ये जिवाजी राव यांच्या निधनानंतर राजमाता विजयाराजे सिंधिया यांनी सिंधिया राजघराण्याची सूत्रं हाती घेतली. तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या म्हणण्याला मान देत त्या काँग्रेसमध्ये सामिल झाल्या. 1967 च्या निवडणुकांदरम्यान त्यांचं काँग्रेसशी बिनसलं. आणि त्यांनी मुख्यमंत्री डीपी मिश्रा यांची भेट घेण्यासाठी भोपाळ गाठलं. तेव्हा मिश्रा यांच्या भेटीसाठी विजयाराजे यांना 10 ते 15 मिनिटं थांबावं लागलं. ही घटना विजयाराजेंच्या अस्मितेला धक्का देणारी होती. या भेटीत त्यांनी आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जबद्दल नाराजी व्यक्त करत पोलीस अधीक्षकांना हटवण्याची मागणी केली, मुख्यमंत्र्यांनी ती फेटाळून लावली. हे वाचा-कमलनाथना बहुमताची खात्री, गेलेल्या आमदारांसह भाजपेच नाराज संपर्कात असल्याचा दावा यानंतर लगेचच विजयाराजेंनी काँग्रेसला रामराम ठोकला. त्या जनसंघाच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढल्या. विजयाराजे सिंधियांच्या या निर्णयामुळे मध्यप्रदेश विधानसभेत काँग्रेस अडचणीत आली. काँग्रेस पक्षाचे 36 आमदार विरोधी पक्षात गेले. आणि काँग्रेसचं डी पी सरकार गडगडलं. आणि मध्य प्रदेशच्या इतिहासात प्रथमच बिगर काँग्रेसी सरकार आलं. ज्याचं पूर्ण श्रेय राजमाता विजयाराजेंना देण्यात आलं. त्यांनी गोविंद नारायण सिंह यांना राज्याच्या मुख्यमंत्रीपदी नेमलं. पण हे सरकार दोन वर्षंही टिकू शकलं नाही. वीस महिन्यांत हे सरकार पाडायला कारण ठरला गोविंद नारायण सिंह यांचा काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय. सत्तेच्या या सारीपाटात मध्य प्रदेशमध्ये जनसंघाचं बळ वाढलं. आणि विजयाराजे सिंधिया यांचं राजकारणातलं स्थान मजबूत झालं. त्या प्रचंड लोकप्रिय होत्या. याची प्रचिती आली 1971 साली. कारण इंदिरा गांधी नावाचं वादळ राजकारणात घोंगावत असतानाही मध्यप्रदेशातून तीन लोकसभा जागांवर राजमाता विजयाराजे आणि जनसंघाचे उमेदवार निवडून आले. राजकारणातली ही तीन महत्त्वाची नावं म्हणजे भिंडहून विजयाराजे, गुनाहून माधवराव सिंधिया आणि ग्वाल्हेरहून अटल बिहारी वाजपेयी. नंतरच्या काळात माधवराव सिंधियांनी जनसंघातून बाजूला होत काँग्रेसमध्ये सामिल होण्याचा निर्णय घेतला. माधवराव सिंधियांनी काँग्रेसची साथ सोडली नाही. पण त्यांच्या मुलानं ज्योतिरादित्य यांनी मंगळवारी दोन दशकांहून अधिक काळ राहिलेल्या काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला. आणि आजीनं 43 वर्षांपूर्वी घेतलेल्या निर्णयाप्रमाणेच निर्णय घेऊन एक वर्तुळ पूर्ण झालं. हे वाचा-MP मध्ये सत्तासंघर्ष; ज्योतिरादित्य यांच्या भाजप प्रवेशाबाबत सस्पेन्स कायम
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Bhopal, Madhya pradesh

    पुढील बातम्या