बंगळुरू, 22 जानेवारी : भारताने गुरुवारी स्मार्ट अँटी एअरफील्ड वेपनची (SAAW) यशस्वी चाचणी घेतली. ओडिशाच्या किनाऱ्यावर हॉक-आय विमानातून (Hawk I aircraft) सरकारी मालकीच्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने (Hindustan Aeronautics Limited-HAL) या स्मार्ट अँटी एअरफील्ड वेपनची (SAAW) यशस्वी चाचणी घेतली. या स्मार्ट अँटी एअरफील्ड वेपनच्या (SAAW) सहाय्याने शत्रूची शंभर किलोमीटरवरील बंकर्स, रनवे, रडार यंत्रणा, वाहतूक सुविधा आदी ठिकाणांचा अचूक वेध घेता येतो. या अत्याधुनिक शस्त्रामुळे भारताच्या संरक्षण दलाची ताकद अधिक वाढणार आहे, त्यामुळे सीमेपलीकडून हल्ले करणाऱ्या शत्रूला चांगलीच जरब बसणार आहे.
डीआरडीओ (DRDO) अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या संशोधन केंद्राने (आरसीआय-RCI) हे संपूर्ण स्वदेशी बनावटीचं अत्याधुनिक शस्त्र विकसित केलं आहे. याआधी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने (Hindustan Aeronautics Limited-HAL) जॅग्वार विमानातूनही या शस्त्राची यशस्वी चाचणी घेतली होती. आता हॉक-आय विमानात याची चाचणी घेण्यात आली. ती ही यशस्वी ठरली असून, यानंतर राफेल विमानातही याची चाचणी घेण्याची योजना आहे. यामुळे भारतीय वायुदलाची ताकद वाढणार आहे.
(वाचा - लॉटरीची तिकीटं विकता विकता नशीब बदललं; एक निर्णय घेतला आणि झाला 12 कोटींचा मालक)
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचे पायलट निवृत्त विंग कमांडर पी. अवस्थी आणि निवृत्त विंग कमांडर एम. पटेल यांनी हॉक- एमकेआय 132 विमानात ही अत्याधुनिक शस्त्रयंत्रणा बसवून उड्डाण केलं आणि ते लक्ष्याचा अचूक वेध घेत की नाही याची चाचणी घेतली. ही चाचणी अत्यंत यशस्वी ठरली. हा एक नियंत्रित बॉम्ब (Guided Bomb)आहे. कोणत्याही क्षेपणास्त्र (Missile) किंवा रॉकेटपेक्षा (Rocket) स्वस्त असे हे दूरवर मारा करणारे शस्त्र आहे. भारतीय वायुसेनेत याचा समावेश झाल्यानंतर राफेल विमानांमध्येही हे लावण्याची तयारी करण्यात आली आहे. 2013 मध्ये सरकारनं या शस्त्राच्या निर्मितीला परवानगी दिली होती.
याची वैशिष्ट्ये काय -
या शस्त्राचं वजन साधारण 120 किलो आहे. 100 किलोमीटर अंतरावरील लक्ष्याचा हे अचूक वेध घेऊ शकते. त्यामुळे भारताची लढाऊ विमानं आवश्यक त्या उंचीवरून हल्ला करून शत्रूंची ठाणी उद्ध्वस्त करू शकतात. एवढंच नव्हे, तर हा जगातील कमी वजनाचा उत्कृष्ट नियंत्रित बॉम्ब ठरला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.