बडौदा, 19 ऑगस्ट: उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशनंतर गुजरात राज्यानेही लव्ह जिहाद (Law against Love Jihad ) रोखण्यासाठी, तसंच विवाहासाठी होणाऱ्या जबरदस्तीच्या धर्मांतराला प्रतिबंध करण्यासाठी विशेष कायदा जून 2021मध्ये लागू केला होता. 'गुजरात धर्म स्वातंत्र्य (सुधारणा) अधिनियम 2021' (Gujarat Freedom of Religion (Amendment) Act 2021) असं त्याचं नाव आहे. या कायद्यातल्या काही कलमांवर गुजरात हायकोर्टाने (Gujarat Highcourt) प्रतिबंध घातला आहे. या कायद्याला आव्हान देणाऱ्या एका याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टाने हा निकाल दिला आहे. 'टीव्ही नाइन हिंदी'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
या खटल्याच्या सुनावणीवेळी मंगळवारी राज्य सरकारने हायकोर्टात आपली बाजू मांडली होती आणि कायद्याचं समर्थन केलं होतं. हा कायदा केवळ विवाहाच्या कारणासाठी होणाऱ्या बेकायदा आणि जबरदस्तीच्या धर्मांतराच्या विरोधात आहे; मात्र तो दुसऱ्या धर्माच्या व्यक्तीशी विवाह करण्यावर बंधन घालत नाही, असा दावा सरकारने कोर्टात केला. हायकोर्टाने उपस्थित केलेल्या अनेक शंकांना सरकारी वकिलांनी उत्तरं दिली; दरम्यान, आजच्या (19 ऑगस्ट) सुनावणीदरम्यान हायकोर्टाने या कायद्यातल्या काही कलमांवर निर्बंध घालत असल्याचं जाहीर केलं.
लग्नानंतरचं प्रेम;कुटुंबीयांनी आक्षेपार्ह स्थितीत पाहिल्यानंतर दोघांची आत्महत्या
अशा प्रकारचा कायदा अगोदर उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश राज्याने लागू केला होता. त्या राज्यांच्या पावलावर पाऊल ठेवून गुजरातमध्येही (Gujarat Freedom of Religion (Amendment) Act 2021) हा कायदा एक एप्रिल रोजी विधानसभेत पारित झाला होता. गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी 22 मे रोजी त्यावर स्वाक्षरी केली आणि 15 जूनपासून गुजरात राज्यात हा कायदा लागू करण्यात आला होता. कायदा लागू झाल्या झाल्या तीन-चार दिवसांतच पहिला एफआयआर बडोद्यात दाखल झाला होता. समीर अब्दुलभाई कुरेशी नावाच्या एका तरुणाने इन्स्टाग्रामच्या (Instagram) माध्यमातून एका तरुणीशी मैत्री केली. त्याने आपलं नाव सॅम मार्टिन असल्याचं सांगून आपण ख्रिश्चन असल्याचं भासवलं. त्यानंतर त्याने तरुणीला आपल्या जाळ्यात ओढलं आणि शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडलं. तसंच, त्यांच्यातल्या त्या खासगी क्षणांचे फोटो त्याने टिपले. ते फोटो दाखवून त्या तरुणाने तिला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. त्याच्याशी विवाह केला नाही, तर फोटो व्हायरल करण्याची धमकी त्याने दिली. त्यानंतर 2019 साली दोघांनी विवाह केला. विवाहानंतर संबंधित तरुणीला सॅम मार्टिन हा समीर अब्दुलभाई कुरेशी असल्याचं कळलं. त्यानंतर संबंधित तरुणीने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. अशा प्रकारे आणखीही अनेक पोलिस ठाण्यांत या कायद्यानुसार एफआयआर दाखल झाले आहेत.
नेलपेंट, सँडल्सवरही तालिबान्यांचं 'राज'; अफगाणिस्तानात महिलांवर लादले क्रूर नियम
लग्नानंतर जबरदस्तीने धर्मांतर, कोणाशीही खोटं बोलून विवाह करणं, अशा विवाहाला साह्य करणं हे या कायद्यानुसार गुन्हे आहेत. यात दोषी असल्याचं सिद्ध झालं, तर आरोपीला 3 ते 5 वर्षांचा तुरुंगवास आणि दोन लाख रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो. यातली पीडित मुलगी 18 वर्षांपेक्षा लहान असेल किंवा अनुसूचित जाती वा जमातीची असेल, तर चार ते सात वर्षांचा तुरुंगवास आणि कमीत कमी तीन लाख रुपयांच्या दंडाची तरतूद आहे. कोणती संस्था-संघटना या गुन्ह्यात सहभागी असेल, तर तीन ते 10 वर्षांच्या सजेची तरतूद आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: High Court, Love jihad