अंबाला (हरियाणा), 29 जुलै: पोलीस अधिकारी होऊन धडाडीने काम करण्याची अनेक तरुणांची इच्छा असते. IPS व्हायचं भाग्य त्यातल्या निवडक काहींना मिळतं. काही जण या धडाडीच्या पण ताणाच्या कामातून स्वेच्छानिवृत्तीही पत्करतात. गेली 23 वर्षं धडाडीच्या ऑफिसर म्हणून नावलौकिक मिळवलेल्या हरयाणातल्या (Haryana) अंबालाच्या (Ambala) पोलिस महानिरीक्षक भारती अरोरा यांनीही स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज केला आहे. पण त्यांच्या अर्जाची चर्चा आहे त्यांनी दिलेल्या कारणामुळे.
उर्वरित आयुष्य कृष्णभक्तीत व्यतीत करण्याची इच्छा आहे. म्हणून सेवानिवृत्ती द्या, असा IPS भारती अरोरा यांनी अर्ज केला आहे. पोलिस दलातल्या 23 वर्षांच्या सेवेनंतर त्यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केला आहे. आतापर्यंत जीवन गुन्हेगारांना धडा शिकवण्यासाठी व्यतीत केल्यानंतर भारती यांना यापुढच्या जीवनात कृष्णभक्तीत लीन व्हायचं आहे. हरियाणातल्या वरिष्ठ आयपीएस अधिकारी (IPS Officer) असलेल्या भारती अरोरा यांनी आपल्या कार्यकाळात अनेक महत्त्वाच्या गुन्ह्यांच्या तपासात महत्त्वाची भूमिका निभावली असून, धडाडीने काम करण्याच्या पद्धतीसाठी त्या ओळखल्या जातात.
हिंदू असल्याचं सिद्ध करण्यासाठी तरुणाचा मेरठ ते सर्वोच्च न्यायालय पायी प्रवास
भारती अरोरा 1998च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. 2007मध्ये समझोता एक्स्प्रेसमध्ये (Samjhauta Express Blast case) बॉम्बस्फोट झाला, त्या वेळी (रेल्वे) पोलिस अधीक्षक (Police Superitendent) या नात्याने त्यांनी त्या प्रकरणाचं कामकाज पाहिलं होतं. सध्या हरियाणाच्या राज्य सरकारमध्ये मंत्री असलेल्या अनिल विज (Anil Vij) यांना अरोरा यांनी 2009मध्ये अटक केली होती. तेव्हा त्या अंबालाच्या पोलिस अधीक्षक होत्या आणि अनिल विज आमदार होते. त्या प्रकरणाची बरीच चर्चा झाली होती. 2015मध्ये आपले वरिष्ठ अधिकारी नवदीपसिंग विर्क यांच्यासोबत झालेल्या त्यांच्या वादाचीही बरीच चर्चा झाली होती. त्यांनी बलात्काराच्या एका प्रकरणाच्या तपासात हस्तक्षेप केल्याचा आणि आपल्याला धमकावल्याचा आरोप अरोरा यांनी केला होता.
अशा डॅशिंग व्यक्तिमत्त्वाच्या भारती अरोरा यांनी कृष्णभक्तीचं (Krishna) कारण देऊन स्वेच्छानिवृत्तीची मागणी केली आहे. 'मी आता गुरू नानकदेव, चैतन्य महाप्रभू, कबीरदास, तुलसीदास, सूरदास, मीराबाई, सूफी यांसारख्या महान संतांनी दाखवलेल्या मार्गावर चालू इच्छिते. मी आता जीवनाचं अंतिम उद्दिष्ट गाठू इच्छिते. त्यासाठी उर्वरित जीवन मला कृष्णभक्तीसाठी समर्पित करायचं आहे. म्हणूनच पोलिस दलातल्या 23 वर्षांच्या सेवेनंतर मी आता सेवानिवृत्त होऊ इच्छिते,' असं भारती अरोरा यांनी म्हटलं आहे.
पण त्या मुली समुद्रावर गेल्याच कशासाठी? गँगरेप प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा सवाल
'मी, माझ्या वयाच्या 50व्या वर्षी अखिल भारतीय सेवा नियम 1958 च्या नियम 16 (2) नुसार एक ऑगस्ट 2021 पासून स्वेच्छानिवृत्ती मिळण्यासाठी अर्ज करत आहे,' असं अरोरा यांनी आपल्या पत्रात लिहिलं आहे. पोलिस महासंचालक मनोज यादव यांच्या माध्यमातून अरोरा यांनी हे पत्र मुख्य सचिव विजय वर्धन यांना पाठवलं आहे.
आपल्या कार्यकाळातल्या अनेक गुन्ह्यांच्या तपासात चर्चेत आलेल्या भारती अरोरा स्वेच्छानिवृत्तीच्या बातमीमुळे आणि त्यामागच्या कारणामुळेही पुन्हा चर्चेत आल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Haryana, IPS Officer, Woman