फेसबुक फ्रेंडच्या नादात पाकच्या जेलमध्ये अडकला, 6 वर्षांनंतर हामिद येणार मुंबईत!

फेसबुक फ्रेंडच्या नादात पाकच्या जेलमध्ये अडकला, 6 वर्षांनंतर हामिद येणार मुंबईत!

हामिद अन्सारीचं पाकिस्तानमध्ये जाण्याचं कारण काही वेगळंच होतं.

  • Share this:

17 डिसेंबर : पाकिस्तानने भारतीय कैदी हामिद निहाल अन्सारीची सुटका केली आहे. हामिद अन्सारीने पाकिस्तानच्या जेलमध्ये 6 वर्षांची शिक्षा भोगली. हामिद आता मंगळवारी वाघा बॉर्डरवरून भारतात परतणार आहे.  परंतु, हामिद पाकिस्तानात का पोहोचला ही बाब गंमतीशीर आणि तितकीच गंभीर आहे.

याआधी पाकिस्तानच्या न्यायलयानं हामिदला परत पाठवण्यासाठी महिन्याभरात औपचारिकता पूर्ण करण्याचे सरकारला आदेश दिले होते. पाकची गुप्तचर संस्थेनं अन्सारीला 2012 मध्ये ताब्यात घेतलं होतं आणि 2015 मध्ये लष्कराच्या कोर्टानं हामिदनं  पाकिस्तानी बनावट ओळखपत्र सोबत बाळगल्याच्या आरोपाखाली 3 वर्षांची शिक्षा सुनावली होती.

15 डिसेंबर 2015 रोजी शिक्षा सुनावल्यानंतर 33 वर्षीय हामिद अन्सारी हा पेशावर येथील कारागृहात शिक्षा भोगत होता. हामिद हा मुंबई येथील रहिवासी आहे. त्याची 3 वर्षांची शिक्षा 15 डिसेंबर 2018 रोजी पूर्ण झाली. परंतु, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी त्याला भारतात पाठवण्यात येत नव्हतं. पेशावर उच्च न्यायालयानं सरकारला एका महिन्यात भारतात पाठवण्याचे आदेश दिल्यानंतर हामिदचा मार्ग मोकळा झाला.

पाकिस्तानी पराराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मोहम्मद फैसल यांनी सांगितलं की, अन्सारीची शिक्षा पूर्ण झाली आहे. आम्ही त्याला भारताच्या स्वाधीन करणार आहोत. तो एक भारतीय गुप्तहेर आहे. त्याने बेकायदेशीररित्या पाकमध्ये प्रवेश केला होता. त्याच्याकडे खोटी कागदपत्रंही आढळली होती असा दावा फैसल यांनी केला.

पाकिस्तानी गुप्तचर संस्था आणि कोहाट येथील स्थानिक पोलिसांनी 2012 मध्ये हामिदला अटक केली होती. अचानक हामिद बेपत्ता झाल्यामुळे त्याची आई फौजिया अन्सारी यांनी कोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर हामिद हा पाकिस्तानात असल्याचं कळालं होतं.

परंतु, हामिद अन्सारीचं पाकिस्तानमध्ये जाण्याचं कारण काही वेगळंच होतं. फेसबुकवर त्याची एका पाकिस्तानी तरुणीशी ओळख झाली होती. फेसबुकवर या तरुणीशी त्याची चांगली मैत्री झाली. त्यामुळे या पाकिस्तानी तरुणीला  भेटण्यासाठी हामिद हा थेट अफगानिस्तानमध्ये पोहोचला. तिथून तो मग पाकिस्तानात पोहोचला होता. पण पोलिसांच्या ताब्यात सापडल्यामुळे त्याला 6 वर्ष तुरुंगात शिक्षा भोगावी लागली.

====================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 17, 2018 11:22 PM IST

ताज्या बातम्या