Home /News /national /

या शाळेत 'फी' ऐवजी स्वीकारला जातो प्लास्टिकचा कचरा

या शाळेत 'फी' ऐवजी स्वीकारला जातो प्लास्टिकचा कचरा

पैशाऐवजी प्लास्टिक फी स्वीकारणारी ही शाळा हा अभिनव प्रयोग करते आहे. विद्यार्थ्यांकडून प्लास्टिक घेण्याचं कारण नेमकं आहे काय?

    गुवाहाटी, 7 मे : प्लास्टिकमुळे होणारं प्रदूषण याबद्दल नव्याने काही सांगायची गरज नाही. महाराष्ट्रात प्लास्टिक बंदीचा प्रयोगही झाला. तो कितपत यशस्वी झाला, हे आसपासच्या प्लास्टिकच्या कचऱ्यावरून कळेल. पण आसामच्या एका छोट्या शाळेने मात्र बंदीऐवजी एक अभिनव प्रयोग केला आहे. त्यांनी प्लास्टिक चक्क चलनात आणलंय. ही शाळा प्लॅस्टिक फी म्हणून स्वीकारते. प्लास्टिकच्या प्रदूषणाबद्दल जनजागृती करण्याच्या उद्देशाने आणि या विघटन न होणाऱ्या कचऱ्याची योग्य रीतीने विल्हेवाट लावण्यासाठी शाळेनं विद्यार्थ्यांकडून फीच्या मोबदल्यात प्लास्टिक स्वीकारणं सुरू केलं. गुवाहाटीच्या पामोही भागातली अक्षर नावाची शाळा हा अभिनव प्रयोग करते आहे. गरीब विद्यार्थ्यांना शाळेनं फी माफ केली आहे. त्या बदल्यात त्यांनी वापरलेलं प्लास्टिक शाळेकडे जमा करावं, अशी त्यांची योजना आहे. ही शाळा स्थापन झाल्यापासून त्यांनी प्लॅस्टिकच्या वापराबद्दल जनजागृती व्हावी यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे. 2016 पासूनच शाळा गरीब विद्यार्थ्यांना फी ऐवजी प्लास्टिक जमा करायला सांगत आहे. प्लास्टिक जाळल्याने काय दुष्परिणाम होतात, प्लास्टिकच्या कचऱ्याची समस्या किती भयानक आहे हे विद्यार्थ्यांना समजावं आणि त्यांनीही त्याबद्दल जनजागृती करावी असा या योजनेचा उद्देश आहे. विद्यार्थ्यांनी जमवलेल्या प्लॅस्टिकचा पुनर्वापर केला जातो. शाळेतच प्लास्टिक रिसायकलिंगच्या काही पद्धती शिकवल्या जातात. प्रत्येक विद्यार्थ्याने किमान प्लास्टिकच्या किमान 25 वस्तू जमा करण्याचं बंधन आहे. त्यानंतर त्यांना प्लास्टिक रिसायकलिंगचं प्रशिक्षण दिलं जातं. प्लास्टिकच्या कचऱ्यापासून पासून बांधकामास पूरक साहित्य निर्माण करण्याचं काम विद्यार्थी करतात. शाळा पूर्ण पर्यावरणपूरक तत्त्वावर चालवली जाते. माझिन मुख्तार आणि त्यांची सहकारी पारमिता शर्मा यांनी ही शाळा सुरू केली. माझिन यांना आसामच्या शैक्षणिक क्षेत्रात काहीतरी करण्याची इच्छा होती आणि पारमिता या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या(TISS)विद्यार्थिनीने त्यांचं हे स्वप्न साकार करण्यास मदत केली. सुरुवातीला फक्त 20 विद्यार्थी आणि 7 शिक्षकांसह सुरू झालेली ही शाळा आता मोठी होत आहे. आसाममध्ये लोक थंडीची शेकोटी करण्यासाठी चक्क प्लॅस्टिक जाळतात, हे पाहून या माझिन यांना धक्का बसला आणि त्यांनी प्लास्टिकच्या कचऱ्याचा भस्मासूर किती भयानक आहे याविषयी जनजागृती शाळेच्या माध्यमातून करायचं ठरवलं.
    First published:

    Tags: Plastic, Pollution

    पुढील बातम्या