कौतुकास्पद! गुरुद्वाराने चक्क सुरू केला Oxygen लंगर; असा मिळतो गरजूंना ऑक्सिजन

कौतुकास्पद! गुरुद्वाराने चक्क सुरू केला Oxygen लंगर; असा मिळतो गरजूंना ऑक्सिजन

प्रशासनानं मदत करावी आणि ऑक्सिजन पुरवठा अखंडीत राहील याची खात्री द्यावी, अशी मागणीही गुरुद्वाराच्या संचालकांनी केली आहे.

  • Share this:

गाझियाबाद, 23 एप्रिल : देशभरात सध्या कोरोना बाधित रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी आवश्यक असलेल्या ऑक्सिजनचा (Oxygen) प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. ऑक्सिजनअभावी रुग्ण दगावण्याच्या घटना घडत असून, ऑक्सिजनसाठी रुग्णांच्या नातेवाईकांना धावपळ करावी लागत आहे. अशा या गंभीर परिस्थितीत सरकारी तसंच वैयक्तिक पातळीवरही ऑक्सिजन पुरवठ्याचा प्रयत्न केला जात आहे. यामध्ये गाझियाबाद (Ghaziabad) इथल्या एका गुरुद्वारानं (Gurudwara) चक्क ऑक्सिजन लंगर (Oxygen Langar) सुरू केला असून, इथं येणाऱ्या कोरोना रुग्णांना ऑन रोड (On Road) ऑक्सिजन पुरवला जात आहे. गुरुवारी रात्रीपासूनच तातडीनं ही सेवा सुरू करण्यात आली असून, आतापर्यंत 35 लोकांना ऑक्सिजन पुरवठा करण्यात आल्याचं गुरुद्वाराच्यावतीनं सांगण्यात आलं आहे. शीख धर्मीयांचे प्रार्थनास्थळ असलेल्या गुरुद्वारांमध्ये दररोज मोफत प्रसादाचं वाटप केलं जातं, त्याला लंगर म्हणतात.

दरम्यान, प्रशासनानं यात मदत करावी आणि ऑक्सिजन पुरवठा अखंडीत राहील याची खात्री द्यावी, अशी मागणीही गुरुद्वाराच्या संचालकांनी केली आहे.

इंदिरापुरम (Indirapuram) भागात हा गुरुद्वारा असून, खालसा हेल्प इंटरनॅशनलच्या (Khalsa Help International) सहकार्यानं हा ऑक्सिजन लंगर चालवला जात आहे. याबाबत अधिक माहिती देताना, खालसा हेल्प इंटरनॅशनलचे संचालक गुरुप्रीत सिंह म्हणाले की, शहरात ऑक्सिजन न मिळाल्यामुळे कोरोना रुग्णांचा मृत्यू होत असल्याचं बघून आम्ही हा अभिनव लंगर सुरू केला आहे. 40 ऑक्सिजन सिलेंडर आणि ऑक्सिजन देण्यासाठी आवश्यक यंत्रणा उभारण्यात आली असून, गुरुवारी रात्रीपासूनच ही सेवा सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत 35 लोकांनी याचा लाभ घेतला आहे.’

वाचा: एकीकडे ऑक्सिजन, बेड्सचा तुडवडा तर दुसरीकडे 100 बेड्सचं रुग्णालय धूळखात

‘कोरोना रुग्णांची ऑक्सिजन लेव्हल अचानक कमी व्हायला लागते. अशावेळी कुटुंबीयांना रुग्णासाठी हॉस्पिटलमध्ये बेड मिळवणे किंवा ऑक्सिजनची व्यवस्था करणे कठीण जाते. हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यापूर्वी रुग्ण इथं येऊन ऑक्सिजन घेत आहेत किंवा काही रुग्ण इथं थांबूनच ऑक्सिजन घेत आहेत,’ असंही गुरुप्रीत सिंह यांनी सांगितलं.

‘गाडीतून इथं येणाऱ्या रुग्णांना वाहनातच ऑक्सिजन दिला जातो. जे लोक दुचाकी किंवा रिक्षातून येत आहेत त्यांची गुरुद्वारामध्ये सोय करून ऑक्सिजन दिला जात आहे. या लंगरमध्ये येणाऱ्या रुग्णांना कोणतीही कागदपत्रे द्यावी लागत नाहीत. इथं येताच रुग्णांना ऑक्सिजन पुरवला जातो. प्राथमिक उपचारांसाठी इथं डॉक्टर्सही उपस्थित असून, रुग्णांना चोवीस तास अखंड ऑक्सिजन पुरवठा करता यावा यासाठी प्रशासनानं मदत करावी,’ असं आवाहन गुरुप्रीत सिंह यांनी केलं आहे.

First published: April 23, 2021, 6:32 PM IST

ताज्या बातम्या