प्रचाराच्या रणधुमाळीतच गुजरातमध्ये 'पद्मावती'वर बंदी

'पद्मावती' चित्रपटाचा वाद पूर्णत: निकाली लागत नाही तोपर्यंत गुजरातमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात येत असल्याची घोषणा गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी केली आहे.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Nov 22, 2017 06:08 PM IST

प्रचाराच्या रणधुमाळीतच गुजरातमध्ये 'पद्मावती'वर बंदी

22 नोव्हेंबर : 'पद्मावती' चित्रपटाचा वाद पूर्णत: निकाली लागत नाही तोपर्यंत गुजरातमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात येत असल्याची घोषणा गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी केली आहे. या चित्रपटामुळे लोकांच्या भावना दुखावल्या आहेत याची आम्हाला जाणीव आहे. त्यामुळेच राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. सध्या गुजरातमध्ये निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे.

दरम्यान, मध्य प्रदेश सरकारनेही हा पद्मावती सिनेमा रिलीज होण्याआधीच त्याच्या प्रदर्शनावर बंदी घातलीय. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे आणि उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनीही चित्रपटाला राजपूत समाजाकडून होणारा वाढता विरोध लक्षात घेऊन या सिनेमावर बंदी घालण्याची मागणी केंद्र सरकारला केलाय.

सेन्सॉर बोर्डाने मंजूरी देण्याआधीच पद्मावती चित्रपटावर बंदी घालण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिलाय. राजपुतांची राणी पद्मावती हिच्या जीवनावर आधारित या चित्रपटात काही आक्षेपार्ह दृश्यं असल्याचा आरोप करत याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. पण सुप्रीम कोर्टाने ही याचिकाच फेटाळून लावलीय. सेन्सॉर बोर्डाने एखाद्या चित्रपटाला मंजुरी दिल्यानंतरच सुप्रीम कोर्ट त्याबाबत काही निर्णय देऊ शकतं, असं मत न्यायाधिशांनी पद्मावती चित्रपटाच्या वादासंदर्भात नोंदवलंय.

सिनेमा 1 डिसेंबर रोजी रिलीज होणार होता. आता निर्मात्यांनी त्याचं रिलीज पुढे ढकललंय. सिनेमा न बघताच अशा बंदी सुरू झाल्यामुळे चित्रपट रसिकांमध्ये नाराजीचं वातावरण पसरलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 22, 2017 06:08 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...