Home /News /national /

सुरतमध्ये दारूबंदीचा नियम धाब्यावर! दारूपार्टी करणाऱ्या 17 महिलांसह 50 जणांना पोलिसांनी पकडलं

सुरतमध्ये दारूबंदीचा नियम धाब्यावर! दारूपार्टी करणाऱ्या 17 महिलांसह 50 जणांना पोलिसांनी पकडलं

गुजरातमध्ये दारूबंदी आहे, मात्र वेळोवेळी दारूबंदीचा हा नियम धाब्यावर बसवण्यात आला आहे. कच्छमध्ये दारूने अंघोळ करण्याऱ्या तरुणांचा व्हिडीओ समोर आला होता, आता पुन्हा एकदा सुरतमधून पोलिसांनी दारूपार्टी करणाऱ्या 50 जणांना पोलिसांनी पकडलं आहे.

पुढे वाचा ...
    सुरत, 1 मार्च : गुजरातमध्ये दारूबंदी असताना दारू पार्टीची सलग दुसरी घटना समोर येत आहे. शनिवारी गुजरातच्या कच्छमधून एक व्हिडीओ समोर आला होता, ज्यामध्ये काही तरुण लग्न समारंभादरम्यान एकमेकांना दारूने अंघोळ घालत होते. अशाप्रकारे अवैध दारू विक्री गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात होत असल्याची प्रचिती पुन्हा एकदा झाली आहे. सुरतमधून आणखी एक घटना समोर येत आहे. 29 फेब्रुवारीला सुरतमधील एका फार्म हाऊसवर सुरू असलेल्या लीप ईयर पार्टीमध्ये सर्रास दारू पिताना काही लोकांना पकडण्यात आलं आहे. यामध्ये 17 महिलांसह 50 जणांचा समावेश आहे. पोलिसांनी छापा टाकून या सर्वांना ताब्यात घेतलं आहे. सुरतमधील डुमास रोड याठिकाणी अशाप्रकारची पार्टी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी याठिकाणी छापा टाकला त्यावेळी सर्वजण नशेमध्ये बुडालेले होते. याठिकाणच्या सर्वांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यामुळे सर्वांनीच दारूचं सेवन केल्याचं यानंतर स्पष्ट झालं आहे. (हे वाचा- हे राम! चक्क दारूने घातली अंघोळ, दारूबंदी असणाऱ्या गांधीजींच्या गुजरातमधला VIDEO) गुजरातमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून दारूबंदी आहे. मात्र अनेकदा अवैध दारू गुजरातमध्ये आणली जाते. मध्यप्रदेश, हरयाणा, पंजाब, राजस्थान या ठिकाणांहून दारू आणल्याचा आरोप अनेकदा करण्यात आला आहे. सुरतमधील या घटनेमध्ये पोलिसांनी सर्वांना अटक केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या छाप्यामध्ये पोलिसांनी महागडी विदेशी दारू तर 13 चारचाकी गाड्या जप्त केल्या आहेत. फार्महाऊसमधून पोलिसांनी 3 पेटी बीअर आणि व्होडका जप्त केला आहे. पार्टी सुरू असताना त्याठिकाणच्या फूड काउंटर्सवर सुद्धा खुलेआम दारू ठेवण्यात आली होती.   जेव्हा या तरुणांच्या पालकांना घटनेसंदर्भात सांगण्यात आलं त्यानंतर लगेचच त्यांनी डुमास पोलीस स्टेशन गाठलं. मुलांना अशा अवस्थेमध्ये पाहून त्यांच्या पालकांना रडूच कोसळलं. हे सर्व तरुण-तरुणी मोठ्या कुटुंबातील आहेत. या छाप्यातील तरुणींना नोटीस देऊन सोडण्यात आलं आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    पुढील बातम्या