Home /News /national /

OPINION: गुजरात निवडणुकीतून राजकीय नेत्यांनी घ्यायला हवेत हे धडे

OPINION: गुजरात निवडणुकीतून राजकीय नेत्यांनी घ्यायला हवेत हे धडे

Gujarat Local Body Elections: जनादेशाच्या माध्यमातून गुजरातमधील जनतेने अनेक संदेश दिले आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे राज्य नरेंद्र मोदींची पाठ अजूनही राखून आहे.

जपन पाठक अहमदाबाद, 3 मार्च: गुजरातच्या नागरिकांनी काँग्रेसला (Congress) निवडून दिलेली शेवटची लोकसभा (Loksabha Election) किंवा विधानसभा निवडणूक (Assembly Election) 1985 सालची होती, हे लक्षात घेतलं, तरी 2015 हे काँग्रेसला अनेक सकारात्मक संदेश देणारं वर्ष होतं. त्याआधी एक वर्षापूर्वीच म्हणजे 2014मध्ये नरेंद्र मोदी (Narendra Modi) पंतप्रधान झाल्यामुळे केंद्रात गेले होते. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली होती. जुलै-ऑगस्ट 2015मध्ये पाटीदार आंदोलनामुळे (Patidar Agitation) भाजप (BJP) आणि त्यांच्या खंद्या समर्थकांमध्ये दुरावा निर्माण झाला होता. अशी स्थिती असताना काँग्रेसने ग्रामीण गुजरातमध्ये (Gujarat) धडक मारली आणि शहरी भागांत भाजपच्या विजयाचं अंतर कमी केलं. 1980च्या दशकात भाजपने विजयाची पहिली चव राजकोटमध्ये चाखली होती. 2015मध्ये तिथे भाजप आणि काँग्रेसमध्ये जवळपास 'टाय'ची स्थिती निर्माण झाली. तालुका पंचायतींमध्ये काँग्रेसने 134 जागा जिंकल्या, तर भाजपला 67 जागा मिळाल्या. जिल्हा पंचायतींमध्ये काँग्रेसने 24 जिल्हा मुख्यालयांवर झेंडा फडकवला, तर भाजपला केवळ सहा जिल्हे जिंकता आले. त्यानंतर 2017 सालची गुजरात विधानसभा निवडणूक आली. त्यात काँग्रेसने ग्रामीण भागांतल्या अनेक जागांसह 77 जागा जिंकल्या. 2015च्या निवडणुकीत केलेल्या कमाईची पुण्याई 2017च्या विधानसभा निवडणुकांपर्यंत कामी आली; पण काँग्रेसचं दीर्घकालीन पुनरागमन होण्याच्या/झाल्याच्या आशा 2021च्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर गुजरातच्या शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांमध्ये धुळीला मिळाल्या. शहरी गुजरातमधले निकाल बहुतांशी असेच लागणार, हे अपेक्षित होतं; मात्र विजयाचा फरक भाजपला अपेक्षित होता, त्यापेक्षाही अधिक होता. राजकोट, अहमदाबाद, भावनगर, बडोदा, जामनगरमध्ये भाजपचा वरचष्मा दिसला. सुरतमध्ये भाजपने मोठी कामगिरी करून गतवैभव परत मिळवलं. काँग्रेसने मिळवलेल्या जागांपेक्षा 10 पट अधिक जागा भाजपला मिळाल्या. ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालाकडे बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे. सर्व जिल्हा पंचायतींमधून काँग्रेस हद्दपार झाली आहे. तसंच काँग्रेसची तालुका पंचायतींमधली कामगिरीही चांगली नाही. या निकालामधून गुजरातच्या नागरिकांनी अनेक संदेश दिले आहेत. सगळ्यात पहिला संदेश म्हणजे गुजरात नरेंद्र मोदींच्या पाठीशी एखाद्या मोठ्या खडकासारखा खंबीरपणे उभा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना असलेला गुजरातच्या नागरिकांचा पाठिंबा वाढतोच आहे. एवढंच नव्हे, तर मोदींच्या विरोधात एखादी नकारात्मक मोहीम चालवली गेली, तर त्यांना गुजरातचे लोक नक्की शिक्षा करतील. उदाहरणादाखल, राहुल गांधींनी (Rahul Gandhi) पंतप्रधान मोदींविरोधात सातत्याने राबवलेली मोहीम पाहा. अशा मोहिमेचा उद्देश गुजरातमध्ये सफल होणार नाही. आणखी एक महत्त्वाचा संदेश या निकालातून समोर आला, तो म्हणजे गुजरातच्या नजरेतून काँग्रेस एक पक्ष प्रशासन म्हणून अयशस्वी ठरला आहे. 2015 आणि 2017मधल्या विजयांमुळे काँग्रेसला पर्यायी नेतृत्व उभं करण्याची आणि विकासाचं मॉडेल विकसित करण्याची पुरेपूर संधी होती. त्यामुळे भाजपपेक्षा ते वेगळे ठरले असते. तळागाळातल्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वैयक्तिक आणि पक्ष म्हणून भाजपविरोधात नकारात्मक मोहीम चालवली. जेव्हा एखाद्या पक्षाच्या हातात काहीच नसतं, तेव्हा एक वेळ ठीक आहे; पण जेव्हा त्यांना काम करण्याची संधी असते, तेव्हा अशा प्रकारच्या मोहिमांचं लोकांकडून स्वागत होत नाही. काँग्रेसच्या आमदारांना अगदी त्यांच्या कार्यक्षेत्रातही कोणाला भेटता येत नव्हतं. त्यामुळे 2015 आणि 2017मध्ये अमरेलीसारख्या जिल्ह्यातून भाजपच्या अस्तित्वाला धक्का पोहोचला होता, तिथे भाजपने पुन्हा शिरकाव केला, यात काही नवल नाही. अमरेली हा ग्रामीण आणि पाटीदार समाजबहुल जिल्हा आहे. राजकीय उद्देशाने चालवल्या गेलेल्या मोहिमांना निवडणूक नसलेल्या काळात तळागाळात काम करण्याची जोड हवी, हे गुजरातने दाखवून दिलं आहे. 2015मध्ये बसलेला धक्का भाजपला पुन्हा जागं करण्यासाठी पुरेसा होता. त्यातून त्यांनी आपल्या कार्यपद्धतीचं परीक्षण करून त्यात सुधारणा केली. भाजपचे शहरी भागातले नेते अधिक क्रियाशीलपणे प्रत्यक्ष फिल्डवर उतरलेले दिसू लागले. ग्रामीण भागातल्या नेत्यांनी गावागावांत जाऊन विकासाच्या मॉडेलची लोकांना माहिती दिली, त्यांच्या मनावर ठसवण्याचा प्रयत्न केला. गुजरातमध्ये व्यवसायात आघाडीवर असलेलं राज्य आहे. गुजरातच्या व्यापाऱ्यांची निंदा करणारं भाषण राहुल गांधींनी आसाममध्ये केलं होतं. त्याचाही गुजरातमधल्या अनेकांना राग आलेला असणार. गुजरातच्या ग्रामीण भागांमध्ये अनेक छोटे शेतकरी आहेत. या पार्श्वभूमीवर, गुजरात नव्या शेती कायद्यांकडे कसं पाहतो, याबद्दलचा संदेशही या निवडणुकीने दिला आहे. देशातल्या उत्तुंग शेतकरी नेत्यांपैकी एक असलेल्या सरदार पटेल यांच्या वारशातून प्रेरित झालेले गुजराती शेतकरी कायमच प्रगतीशील असतात आणि शेतीत नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यास उत्सुक असतात. सहकार क्षेत्राचा अवलंब करणाऱ्या आघाडीच्या राज्यांमध्येही गुजरातचा समावेश होतो. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना कच्छ आणि बनासकंठा यांसारख्या दुष्काळी जिल्ह्यांनी शेतीत उत्तम कामगिरी केली. तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांमुळे गुजरातच्या शेतकऱ्यांनी करार शेतीमध्ये यशाची चव चाखली, तिथल्या शेतकऱ्यांच्या शेतीमालाला बाजारपेठेत चांगला भाव मिळू लागला, सिंचनव्यवस्था सहज उपलब्ध होऊ लागल्या आणि असे इतर अनेक फायदे झाले. त्यामुळे नव्या शेतीविषयक कायद्यांविरोधात चालवण्यात आलेल्या मोहिमा गुजरातमध्ये चालू शकल्या नाहीत.

अवश्य वाचा -   ‘चला भाजपाला दाखवूया त्यांची जागा’; प्रसिद्ध अभिनेत्रीची TMC मध्ये एंट्री

मोदींना 'वन मॅन शो' असं संबोधताना त्यांचे समर्थक आणि विरोधकही त्यांच्या एका महत्त्वाच्या गुणाकडे पाहतच नाहीत असं मला वाटतं. तो गुण म्हणजे ते उत्तम संघटक आहेत. मोदी राज्याच्या राजकारणातून देशाच्या राजकारणात जाऊन सात वर्षं होऊनही गुजरातच्या राजकीय पटलावर भाजपचं वर्चस्व कायम आहे. यातूनच मोदींच्या कार्यकाळात मजबूत संघटनानिर्मिती कशी झाली होती, याची प्रचीती येते. कामराज यांच्यानंतर तमिळनाडूत आणि वायएसआर यांच्यानंतर आंध्र प्रदेशात आणि विलासराव देशमुख यांच्यानंतर महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष कसा कोसळला, हे आपण पाहिलं आहे. याच्या उलट, भाजप गुजरातमध्ये नवी उंची गाठत चालला आहे. हे नरेंद्र मोदींच्या संघटनकौशल्याचं जिवंत उदाहरण आहे. आणखी एक उदाहरण देतो. महत्त्वाच्या नियुक्त्या करताना जातीचं प्राबल्य लक्षात घेऊन करणं हे एक पारंपरिक राजकीय शहाणपण मानलं जातं. सी. आर. पाटील यांना पक्षाचे राज्यप्रभारी करून मोदी यांनी ते गणित बदललं. सी. आर. पाटील कोणत्याही प्रभावशाली जातीचे नाहीत. तरीही त्यांनी पक्षाची ऊर्जा कायम ठेवली आहे. पक्षाच्या मोठ्या विजयाचं तेही एक महत्त्वाचं कारण आहे. गुजरातमधून मिळालेले हे महत्त्वाचे धडे आपल्या राजकीय नेत्यांनी काळजीपूर्वक अभ्यासले पाहिजेत आणि त्यातून शिकवण घेतली पाहिजे. (लेखक गुजरातमधील ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत. लेखातील मते त्यांची वैयक्तिक आहेत.)
First published:

Tags: Amit Shah, BJP, Gujrat, Narendra modi

पुढील बातम्या