गुवाहाटी,10 नोव्हेंबर: जीएसटी करप्रणालीमध्ये थोडे बदल होण्याची चर्चा सर्वत्र चालू होती. आता त्याच दिशेने काही ठोस पाऊलं उचलली जात आहेत. आज काही रोजच्या वापरातील 17 गोष्टींवरील जीएसटी कमी करण्यात आला आहे.
आज गुवाहाटीत जीएसटीबाबत काऊन्सिलची महत्त्वपूर्ण बैठक झाली. च्यूइंगगम, चॉकलेट, वॉशिंग पावडर, मार्बल आणि शेविंग क्रीम वर जीएसटी 18 % करण्यात आला आहे. या गोष्टी 28 टक्के कर आकारणीतून वगळली गेली आहेत. तर दुसरीकडे गुजरात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे बदल होत असल्याची टीका विरोधकांकडून होतेय. जवळपास 100 वस्तू या कर आकारणीतून वगळल्या जाण्याची माहिती आहे. ज्या गोष्टींचा वापर मोठ्या प्रमाणावर आहे आणि ज्या जनहितार्थ आहे अशा गोष्टींना करातून वगळण्यासाठी प्राधान्य दिलं गेलं आहे. याशिवाय हॉटेल क्षेत्राकडूनही जीएसटीत 12 टक्के कपात व्हावी अशी मागणी केली जात होती.