ग्रेटर नोएडा, 26 नोव्हेंबर : मोठ्या शहरात बंद घरांमध्ये चोरीच्या घटना सातत्याने घडतच असतात. परंतु, भलेभले लोक चक्रावून जातील अशी चोरीची घटना उत्तर प्रदेशातल्या ग्रेटर नोएडात आम्रपाली लेझर व्हॅली या उच्चभ्रू सोसायटीत घडली आहे. कुटूंब मूळ गावी गेलेलं असताना चोरट्यांनी रोकड, दागिने आदी एक कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याच्या मुद्देमालासह 100 किलो वजनाची तिजोरी आणि घरातल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह डीव्हीआरही पळवला. चोरट्यांनी बिसरख पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं केलं आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचे धागेदोरे शोधले जात आहेत. ‘एबीपी हिंदी’ने या संदर्भात वृत्त दिलं आहे.
पश्चिम ग्रेटर नोएडातल्या बिसरख पोलिस ठाण्याअंतर्गत असलेल्या आम्रपाली लेझर व्हॅली सोसायटीतल्या एका व्हिलामध्ये शशिभूषण राय हे कुटुंबासह राहतात. दिल्लीतल्या एका मीडिया कंपनीत सीएफओ म्हणजेच चीफ फायनान्शियल ऑफिसर या पदावर ते काम करतात. शुक्रवारी (25 नोव्हेंबर) सीएफओ कंपनीत कामाला गेले होते. त्यांचं कुटुंब मूळ गावी गेलं होतं. याच दिवशी सकाळी 11.30 ते दुपारी 3 या वेळेत चोरीची घटना घडली. चोरट्यांनी रोख रक्कम व दागिन्यांची मिळून 1.4 कोटी रुपयांच्या मुद्देमालाची चोरी केली. विशेष म्हणजे सुमारे 100 किलो वजनाची तिजोरी आणि सीसीटीव्हीसह डीव्हीआरही उचलून नेला.
हेही वाचा - अजबच आहे राव! टूथपेस्ट चोरून चोर दुसऱ्या राज्यात फरार; पोलिसांनी तिथं जाऊन ठोकल्या बेड्या
मूळ गावी घर विकून आले होते परत
12 नोव्हेंबर रोजी सीएफओ त्यांच्या कुटुंबासह मऊ येथील मूळ गावी गेले होते. तिथलं घर त्यांनी विकलं होतं. घराचा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर ते 21 नोव्हेंबरला ते परतले होते; पण त्यांची पत्नी व मुलं गावीच राहिली. शुक्रवारी ते ड्युटीवर गेले. घरातले नातेवाईकही बाहेर गेले होते. त्याच वेळी दरवाजाचं कुलूप तोडून चोरटे त्यांच्या घरात घुसले आणि चोरी केली.
घटनेच्या तपासासाठी पाच पथकं नियुक्त
शशिभूषण राय ड्युटी संपवून घरी आल्यानंतर चोरीचा हा प्रकार उघड झाला. घरातल्या कपाटातले कपडे व इतर साहित्य अस्ताव्यस्त पडलं होतं. भर दिवसा झालेल्या या चोरीने बिसरख पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं केलं आहे. चोरट्यांना लवकरात लवकर पकडण्यासाठी पोलिसांनी तत्काळ या घटनेच्या तपासाला सुरुवात केली आहे. चोरीची रक्कम अधिक असल्यानं पोलिसांनी तपासासाठी पाच पथकांची नियुक्ती केली आहे. सर्व बाजूंनी पोलिस आता याचा तपास करत आहेत.
परिसरात असुरक्षिततेचं वातावरण
वर्दळ असलेल्या सोसायटीत भर दिवसा चोरीची घटना घडल्याने परिसरात सध्या असुरक्षिततेचं वातावरण आहे. एक क्विंटलची तिजोरी चोरट्यांनी नेमकी नेली कशी, सोसायटीत सुरक्षा व्यवस्था कशी होती याची माहिती काढण्यासाठी पोलिस कामाला लागले आहेत. परिसरातलं सीसीटीव्ही फुटेज तपासून या घटनेचा तपास लावण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Delhi News