नवी दिल्ली, 6 फेब्रुवारी:सोशल मिडीयाच्या वाढत्या गैरवापरावर आळा घालण्याच्या प्रयत्नांचा एक महत्वाचा भाग म्हणून सोशल मीडिया वापरणाऱ्याचे उत्तरदायित्त्व निश्चित करण्याचे प्रयत्न सरकार करत असल्याचे केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी गुरुवारी लोकसभेत सांगितले. भंडारा-गोंदियाचे खासदार सुनील मेंढे यांनी सोशल मीडीयाच्या गैरवापर संबंधी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय राज्यमंत्री धोत्रे यांनी ही माहिती दिली.
देशात घडणाऱ्या विविध घटनांच्या वेळी विशेषतः जेव्हा कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्न निर्माण होण्याच्या प्रसंगी बऱ्याच वेळा सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर झालेला आपल्याला आढळून आले आहे. सोशल मीडियाचा वाढता गैरवापर रोखण्यासाठी त्याला कायदेशीर मार्गाने नियंत्रित करण्यासाठी केंद्र सरकार करीत असलेल्या उपायोजनांची माहिती सर्वसामान्यांना मिळावी, ह्या उद्देशाने संसदेत हा प्रश्न उपस्थित केला, असे खासदार संजय मेंढे यांनी लोकसभेत सांगितले.
लोकसभेत प्रश्नोत्तराच्या काळात खासदार सुनील मेंढे पुढे म्हणाले, सोशल मीडिया अकाऊंट आणि आधार कार्ड एकमेकांना जोडण्याचे सरकारचे धोरण नाही, असेही राज्यमंत्र्यांनी उत्तरात सांगितले आहे. माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे प्रस्तावित पर्सनल डेटा प्रोटेक्शन विधेयकाच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या गैरवापरावर अंकुश येणार ठेवण्यात येणार आहे. राष्ट्रीय स्तरावर डेटा प्रोटेक्शन प्राधिकरणाची स्थापना करण्याची तयारी केंद्र सरकारने सुरू केली आहे. मात्र, अजूनही सोशल मीडियाचा गैरवापर मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे यावर अंकुश ठेवण्यासाठी केंद्र सरकारने तत्काळ पाऊल उचण्याची गरज आहे.
केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी दिलेल्या उत्तरानंतर अनेक सदस्यांनी याविषयावर बोलण्यासाठी हात उंचावल्यामुळे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सोशल मीडियाच्या गैरवापरावर विस्ताराने चर्चा करण्यासाठी अल्पकालीन चर्चा सभागृहात घडवून आणावी, अशा सूचना केंद्र सरकारला दिल्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.