भूलथापांना बळी पडू नका! Twitterवर अभिनंदन वर्तमान यांचं बनावट अकाउंट

भूलथापांना बळी पडू नका! Twitterवर अभिनंदन वर्तमान यांचं बनावट अकाउंट

विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांच्या नावाने ट्विटर बनावट अकाउंट

  • Share this:

नवी दिल्ली, 03 मार्च : भारतीय वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांच्या नावाने ट्विटर बनावट अकाउंट तयार करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनंदन यांच्या नावे अनेक बनावट ट्विटर अकाउंट्स सुरू करण्यात येत आहेत. या बोगस अकाउंटद्वारे बरीच माहिती आणि काही फोटो शेअर केले जात आहेत.

इतकंच नाही तर त्यांचे ट्विटर अकाउंट खासगी स्वरुपातील असल्याचाही दावा केला जात आहे. अभिनंदन यांच्या नावाचा फायदा घेत सोशल मीडियावर अनेक बनावट अकाउंट्स तयार केली गेली आहेत.

या पार्श्वभूमीवर, कोणचीही फसवणूक होऊ नये, यासाठी भारतीय वायुदलाने @Abhinandan_wc या नावाने सुरू करण्यात आलेले ट्विटर अकाउंट बनावट असल्याचे स्पष्ट केले आहे.

भारतीय वायुदलाने सांगितले की, अभिनंदन वर्तमान यांच्या नावाने ट्विटरवर दिसत असलेले अकाउंट बनावट आहे. या बनावट अकाउंटवर संरक्षणमंत्री निर्मला सीतारमन आणि अभिनंदन यांच्या हॉस्पिटलमधील भेटीचा फोटोदेखील शेअर करण्यात आला आहे. याव्यतिरिकत्त अभिनंदन यांच्या कुटुंबीयांचाही फोटो ट्विट करण्यात आला आहे. सध्या हे अकाउंट डिअॅक्टिव्हेट करण्यात आले आहे.

पण यानंतर लगेचच @dexxture__ या नावाने आणखी एक अकाउंट अॅक्टिव्हेट केले गेले आहे, हे अकाउंट जवळपास 4000 जणांनी फॉलो केले आहे.

याशिवाय, @IAF_Abhinanden आणि @Abhinandan_WCdr यांसारखी कित्येक बनावट अकाउंट्सही अॅक्टिव्ह झाली आहेत.

अभिनंदन यांच्या नावाने कोणत्याही अनधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर माहिती विचारली गेल्यास किंवा अन्य कोणत्याही गोष्टीची मागणी केली गेल्यास, त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहन करण्यात आले आहे.


कोण आहेत अभिनंदन वर्तमान?

भारतीय हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानच्या F-16 लढाऊ विमानांना पिटाळून लावत असताना भारतीय वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन यांचे मिग - 21 बुधवारी (27 फेब्रुवारी) क्रॅश झाले होते. यानंतर त्यांनी पॅरेशूटच्या मदतीने खाली उडी घेतली आणि ते पाकिस्तानच्या हद्दीत उतरले. येथे पाकिस्तानी सैन्याने त्यांना ताब्यात घेतले. गुरुवारी (28 फेब्रुवारी)पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी विंग कमांडर अभिनंदन यांची सुटका करणार असल्याची घोषणा पाकिस्तानच्या संसदेत केली. शांततेचं पाऊल म्हणून आम्ही सुटका करत आहोत, असं इम्रान खान म्हणाले होते. पण खरंतर विंग कमांडर अभिनंदन यांची सुटकेसाठी पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय स्तरावरील दबाव वाढला होता.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 3, 2019 01:52 PM IST

ताज्या बातम्या