राफेलच्या कागदपत्रांची नक्कल जोडलेली याचिका फेटाळून लावा, सरकारची मागणी

राफेलच्या कागदपत्रांची नक्कल जोडलेली याचिका फेटाळून लावा, सरकारची मागणी

राफेल कागदपत्रांची नक्कल काढून ती याचिकेमध्ये जोडणं ही चोरीच आहे. त्यामुळे ही कागदपत्रं जोडलेली याचिका कोर्टाने फेटाळून लावावी, अशी मागणी सरकारने सुप्रीम कोर्टात केली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 13 मार्च : राफेलच्या कागदपत्रांबद्दल केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. राफेलबद्दल दाखल झालेल्या याचिकेत जोडलेली कागदपत्रं संवेदनशील आहेत, असं सरकारने म्हटलं आहे.

या कागदपत्रांची नक्कल काढून ती याचिकेमध्ये जोडणं ही चोरीच आहे. त्यामुळे ही कागदपत्रं जोडलेली याचिका कोर्टाने फेटाळून लावावी, अशी मागणी सरकारने केली आहे. यामध्ये या लढाऊ विमानांच्या युद्धातल्या क्षमतेबद्दलची माहिती आहे. त्यामुळे ती संवेदनशील आहेत,असंही सरकारचं म्हणणं आहे.

ही कागदपत्रं फोडण्याचा कट ज्यांनी रचला त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत कारण अशा संवेदनशील कागदपत्रांची नक्कल करणं हा कार्यालयीन गुप्ततेचा भंग आहे. या प्रकरणाची कोर्टाने सखोल चौकशी करावी, असं सरकारने या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे.

राफेल डीलप्रकरणी सुप्रीम कोर्टात अनेक याचिका दाखल झाल्या आहेत. याआधी या व्यवहाराची CBI चौकशी व्हावी, अशी मागणी करणारी याचिका कोर्टाने फेटाळून लावली होती.

याआधी, राफेल डीलबद्दलची कागदपत्रं चोरून ती याचिकेत जोडण्यात आली, असा आक्षेप सरकारने घेतला होता. त्यानंतर अॅटर्नी जनरल के. के. वेणूगोपाल यांनी यू टर्न घेतला आणि ही कागदपत्रं चोरीला गेलीच नाहीत, असं वक्तव्य केलं.

राफेलच्या कागदपत्रांबद्दल केलेल्या उलटसुलट वक्तव्यांमुळे राजकीय गदारोळ उठला. राहुल गांधींनीही यावरून सरकारला लक्ष्य केलं.

ही कागदपत्रं चोरीला गेल्याची बातमी हिंदू या वृत्तपत्रानं 6 मार्चला दिली होती. ही कागदपत्रं संवेदनशील असल्याने सरकारने हिंदू या वृत्तपत्रालाही अशा बातम्या न छापण्याच्या सूचना दिल्या होत्या. हा कार्यालयीन गुप्ततेचा भंग आहे, असंही सरकारने म्हटलं होतं.

=============================================================================================

First published: March 13, 2019, 5:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading