इंदौर, 26 ऑगस्ट: काही दिवसांपूर्वी पुण्यातील औंध परिसरात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी याचं मंदिर (PM Narendra Modi Temple) बांधण्यात आलं होतं. त्या मंदिरात PM मोदींची मूर्ती देखील बसवण्यात आली होती. पण केंद्र सरकारकडून कानपिचक्या दिल्यानंतर ते मंदिर हटवण्यात आलं होतं. हे प्रकरण ताजं असताना आता इंदोर येथील एका सराफनं थेट PM मोदींच्या चांदीच्या मूर्ती विक्रीला ठेवल्या (PM Modi Idol For Selling) आहेत. त्यांनी मुंबईतील एका खास व्यापाऱ्याकडून या चांदीच्या मूर्ती बनवून (Silver Idol) घेतल्या आहेत. त्यांनी मोदींची मूर्ती विक्रीला ठेवल्यानंतर त्याचा फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.
संबंधित सराफानं आपल्या दुकानात मोदींच्या वेगवेगळ्या मुद्रा आणि कुर्ता घातलेल्या मूर्ती विक्रीसाठी ठेवल्या आहेत. निर्मल वर्मा असं संबंधित सराफाचं नाव असून ते इंदौरमधील छोटा सराफा परिसरातील रहिवासी आहेत. वर्मा हे पंतप्रधान मोदींना आपला आयकॉन मानतात. याशिवाय वर्मा हे भाजप व्यापारी सेलचे अध्यक्षही आहेत. गेल्या काही काळापासून ते शहरात 'हर हर मोदी, घर घर मोदी' ही मोहिम राबवत आहेत. मागील बऱ्याच काळापासून ते आपल्या दुकानातून पीएम मोदींची चांदीची नाणी आणि नोटांची विक्रीदेखील करत आहेत.
हेही वाचा-केंद्र सरकारच्या 'या' मोठ्या निर्णयामुळे देशातील लाखो तरुणांना मिळू शकतो रोजगार
पण अलीकडेच त्यांनी मुंबईतील ज्वेलर्सच्या एका ग्रुपमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चांदीच्या मूर्ती पाहिल्या. यानंतर त्यांनी विशेष ऑर्डर देऊन या मूर्ती बनवून घेतल्या असून संबंधित मूर्ती दुकानात विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. निर्मल वर्मा यांच्या मते, पीएम मोदींच्या या मूर्ती चांदीच्या असून त्याचं वजन 150 ग्रॅम इतकं आहे. तर त्याची उंची 7 इंच आहे. या मूर्ती वेगवेगळ्या मुद्रा आणि कुर्त्यांमध्ये उपलब्ध आहेत.
हेही वाचा-'सगळे मुस्लीम दहशवादी नाही, आम्हाला लक्ष्य केलं जातंय'; मुनव्वर राणा भडकले
सध्या त्यांच्याकडे फक्त 2 मूर्ती उपलब्ध आहेत. पण वाढती मागणी लक्षात घेता येत्या काळात अशा प्रकारच्या आणखी मूर्ती बनवाव्या लागतील असंही वर्मा यांनी सांगितलं आहे. अलीकडेच त्यांनी आणखी पाच मूर्तींची ऑर्डर दिली आहे. या पाच मूर्ती लवकरच इंदौरला येणार आहेत. 150 वजनाच्या या चांदीच्या मूर्तीची किंमत 11 हजार रुपये इतकी असल्याचं सांगितलं जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.