Home /News /national /

Goa Election 2022 : उत्पल पर्रीकरांची भाजपला सोडचिठ्ठी; पण त्यांच्या 'या' वाक्याने संभ्रम, भाजपला रामराम की वेगळं काही?

Goa Election 2022 : उत्पल पर्रीकरांची भाजपला सोडचिठ्ठी; पण त्यांच्या 'या' वाक्याने संभ्रम, भाजपला रामराम की वेगळं काही?

उत्पल पर्रीकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपण पणजीतून अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. या दरम्यान भाजपच्या गोटातून एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

    पणजी, 21 जानेवारी : गोव्यात राजकीय घडामोडींना (Goa Politics) प्रचंड उधाण आलं आहे. विशेष म्हणजे भाजपचे ज्येष्ठ दिवंगत नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांचे चिरंजीव उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांनी पणजी (Panjim) मतदारसंघातून आपल्याला विधानसभा निवडणुकीसाठी (Goa Election 2022) उमेदवारी मिळावी यासाठी पक्षाविरोधात बंड पुकारलं आहे. उत्पल यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपण पणजीतून अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. या दरम्यान भाजपच्या (BJP) गोटातून एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. गोवा भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तनावडे (Sadanand Tanavade) यांनी 'नवभारत टाईम्सला' दिलेल्या प्रतिक्रियेत उत्पल पर्रीकर यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्याची माहिती दिली आहे. 'भाजपने उत्पल पर्रीकरांचा राजीनामा स्वीकारला' "मला आज उत्पल यांचं पत्र मिळालं आहे. त्यामध्ये त्यांनी आपण भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि राज्य कार्यकारिणी सदस्यत्वाचा राजीनामा देत आहोत. आपला राजीनामा स्वीकार करावा, असं म्हटलं आहे. पक्षाने त्यांचा राजीनाम्याचा स्वीकार केला आहे. तसेच मी त्यांना त्यांच्या राजकीय भविष्यासाठी शुभेच्छा देतोय", असं सदानंद तनावडे यांनी म्हटलं. उत्पल यांच्या 'या' वक्तव्याने संभ्रम उत्पल यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्याची माहिती समोर आली असताना दुसरीकडे त्यांच्या पत्रकार परिषदेतील एका वाक्याने प्रचंड संभ्रम निर्माण केलाय. "मी अपक्ष लढत असलो तरी माझ्या मनात भाजप रोज असणार. मी आगामी परिस्थितीला सामोरं जायला तयार आहे", असं उत्पल पर्रीकर म्हणाले आहेत. तसेच पणजीत आपल्या वडिलांसोबत अनेक वर्ष ज्या कार्यकर्त्यांनी-माणसांनी साथ दिली त्यांच्यासाठी आपण हे पाऊल उचलल्याचं वक्तव्यदेखील उत्पल यांनी केलं आहे. उत्पल यांच्या या वक्तव्यामुळे स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. उत्पल यांचा बंड असला तरी त्यांना भाजपकडून छुपा पाठिंबा तर नाही ना, पणजीतल्या भाजप कार्यकर्त्यांचा मनातून उत्पल यांना खमका पाठींबा तर नाही ना ज्यातून ते एवढं मोठं पाऊल उचलत आहेत, अशा विविध चर्चा सुरु आहेत. कदाचित उत्पल यांनी निवडणुकीपुरता भाजपला सोडचिठ्ठी दिली. निवडून आल्यानंतर पुन्हा भाजपशी गोड व्हायचं, अशी काही रणनिती आहे का? अशी चर्चा आता रंगू लागली आहे. (गोव्यात उत्पल पर्रीकरांचं भाजपविरोधात बंड, देवेंद्र फडणवीसांना सडेतोड उत्तर) गोव्यात भाजपला बळकट करण्यामध्ये मनोहर पर्रीकर यांचं प्रचंड योगदान आहे. मनोहर पर्रीकर हे पणजी विधानसभा मतदारसंघातून तब्बल सहावेळा निवडून आले आहेत. त्यामुळे उत्पल यांना पणजीच्या नागरिकांचा चांगला पाठींबा असल्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पणजीत नेमकं काय राजकारण शिजतंय ते आगामी काळात नक्कीच समोर येईल. शिवसेना की आपसोबत जाणार? उत्पल यांचं रोखठोक मत जेव्हा माझे वडील सक्रिय होते तेव्हा मी कधीच दिसलो नसेल. आता मला जे माझ्याबरोबर आहेत त्यांच्यासाठी उभं राहायचं आहे, असं उत्पल आज पत्रकार परिषदेत म्हणाले होते. दरम्यान उत्पल पर्रीकर यांना शिवसेना आणि आपच्या ऑफरबद्दल विचारलं तेव्हा आपण कोणत्याही पक्षाची ऑफर स्विकारणार नसल्याचं ते म्हणाले. "मी माझ्याच पक्षाची ऑफर घेत नाहीय. तर दुसऱ्या पक्षाच्या ऑफरचा विचारच होऊ शकत नाही. ते माझ्या मनातच येणार नाही. दुसऱ्या पक्षाचा विचार माझ्या डोक्यात येऊच शकणार नाही", असं उत्पल यांनी स्पष्ट केलं. (शिवसेनेची रणनीती, मनोहर पर्रीकरांच्या मुलाविरोधात गोवा माजी RSS प्रमुखाच्या मुलाला उमेदवारी) "मी माझ्या पक्षाकडेही मला काहीतरी हवंय म्हणून करत नाहीय. त्यांनी मला पर्याय सांगितले. मला लोकांना पर्याय द्यायचे आहेत. माझा विचार गोव्याच्या नागरिकांसाठी आहे. त्यांना पणजीतून जिथे माझा लोकांशी, कार्यकर्त्यांसोबत संबंध आहे, त्यांना ऑप्शन द्यायचं आहे. त्यांनी जर मला रिजेक्ट केलं तर मी मान्य करेन. मी अपक्ष लढत असलो तरी माझ्या मनात भाजप रोज असणार. मी आगामी परिस्थितीला सामोरं जायला तयार आहे", अशी प्रतिक्रिया उत्पल पर्रीकर यांनी दिली.
    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या