हैदराबाद 04 डिसेंबर: सर्व देशाचं लक्ष लागलेल्या हैदराबाद महापालिकेच्या निवडणुकीत (GHMC Election Result) चांगलेच चढउचार बघायला मिळाले. भाजपची सुरुवातीला वेगात असलेली गाडी रोखण्यात TRS ला यश मिळालं. नंतर TRSने मोठी आघाडी घेतली. मात्र या निकालांनी भाजपला मोठा फायदा होणार आहे. भाजप दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून पुढे येत असून AIMIMलाही मोठा धक्का बसला आहे.
दुपारी 4 वाजेपर्यंत हाती आलेल्या कलानुसार TRS 66, भाजप 34 आणि AIMIM 37 जागांवर आघाडीवर आहे. हैदराबादच्या निकालांनी उत्साहित झालेले भाजपचे नेते सांबित पात्रा यांनी तर 2023 मध्ये तेलंगणात भाजपचं सरकार येणार असल्याची घोषणाही केली आहे.
2016च्या निवडणुकीत भाजप 4 टीआरएस 3 तर एमआयएमने 44 जागावर विजय मिळवला होता. त्यामुळे सगळ्याच पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. भाजपचे राष्ट्रीय नेतेही यावेळी प्रचारात उतरले होते. दक्षिणेतल्या राज्यांमध्ये भाजपला आपली पकड मजबुत करायची असून त्यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात येत आहे.
भाजपकडून अमित शाह यांच्यापासून ते स्टार प्रचारक योगी आदित्यनाथ यांच्यापर्यंत अनेक नेत्यांनी कंबर कसली होती. हैदराबादमध्ये कमळ फुलवण्याचा निश्चय करत त्यांनी प्रचार केला आणि 2016च्या तुलनेत आता सध्याची स्थिती पाहता भाजप कमळ फुलवण्यात यशस्वी होणार असं दिसत आहे. हैदराबादचा गड राखणं भाजपसाठी का महत्त्वाचं आहे हे देखील जाणून घेणं तितकच महत्त्वाचं आहे.
नगरपालिका निवडणुकीत देशात पहिल्यांदाच भाजप इतक्या आक्रमक आणि पूर्ण तयारीनिशी उतरल्याचं पाहायला मिळालं. पण आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची ही तयारी असल्याची चर्चा आहे. 2023 रोजी तेलंगणा इथे विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकीला जरी वेळ असला तरी भाजपसाठी इथल्या 24 विधनसभेच्या जागा आणि 5 लोकसभेच्या जागा जिंकण्यासाठी भाजपने ही पूर्वतयारी केली आहे.