SBI च्या लॉकरमध्ये होत्या गांधीजींच्या अस्थी, 46 वर्षांनी केलं विसर्जन

गांधीजींच्या अस्थी ओडिसात एसबीआयच्या एका लॉकरमध्ये होत्या. त्याचे विसर्जन तब्बल 46 वर्षांनी करण्यात आलं.

News18 Lokmat | Updated On: Oct 2, 2019 06:52 AM IST

SBI च्या लॉकरमध्ये होत्या गांधीजींच्या अस्थी, 46 वर्षांनी केलं विसर्जन

नवी दिल्ली, 02 ऑक्टोबर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 150 वी जयंती साजरी केली जात आहे. गांधीजींच्या अस्थींवरून 90 च्या दशकात देशात मोठा गदारोळ माजला होता. त्यांच्या अस्थींचे विसर्जन 46 वर्षांनी गांधीजींचे पणतू तुषार गांधी यांनी केलं. 1950 पासून त्यांच्या अस्थी एका लाकडी बॉक्समध्ये एसबीआयच्या लॉकरमध्ये ठेवण्यात आल्या होत्या अशी बातमी 1996 मध्ये ओडीसातील काही वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध झाली. त्यानंतर राज्य सरकारवर टीका करण्यात आली. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहचलं. तत्कालिन सरन्यायाधीश अहमदी यांच्या अध्यक्षतेखाली या प्रकरणावर सुनावणी झाली होती.

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांकडून ओडिसातील माध्यमांना 90 च्या दशकात गांधीजींच्या अस्थी बँकेच्या लॉकरमध्ये असल्याची माहिती मिळाली होती. ही माहिती समोर येताच यामागचं काऱण आणि हे कोणी केलं याबद्दल लोकांना काहीच समजलं नाही. अनेकांनी या अस्थी महात्मा गांधींच्या नाही तर सुभाष चंद्र बोस यांच्या आहेत असंही म्हटलं.

गांधीजींचे पणतू तुषार गांधी यांनी 1996 मध्ये ओडिसाचे मुख्यमंत्री, राज्यपाल आणि एसबीआयचे चेअरमन यांना पत्र लिहून या प्रकरणाची चौकशी करण्यची मागणी केली होती. यावर एसबीआयने आम्ही लवकर चौकशी करू असं म्हटलं होतं. त्यानंतर बँकेच्या अधिकाऱ्यांनी तुषार गांधीना लॉकरमध्ये असलेल्या अस्थी महात्मा गांधींच्याच असल्याची माहिती दिली होती. तसेच अस्थी असलेल्या बॉक्सवर अस्थीज ऑफ महात्मा गांधी असं लिहण्यात आलं आहे असं सांगितलं होतं.

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी एक पत्रही तुषार गांधी यांना पाठवलं होतं. यामध्ये म्हटलं होतं. की, 29 नोव्हेंबर 1950 रोजी ओडिसाच्या मुख्यमंत्र्याच्या सचिवांनी 18 इंच बाय 20 इंच आकाराचा बॉक्स बँकेच्या लॉकरमध्ये ठेवला होता. याची पोचपावती बँकेनं दिली होती. तसेच बँकेनं हा बॉक्स जपून ठेवला आहे आणि तो पूर्ण सुरक्षित आहे.

दरम्यान, ओडिसाच्या मुख्यमंत्र्यांनाही याची कल्पना बँकेनं दिली होती. मात्र, त्यावर कोणताही प्रतिसाद राज्य सरकारकडून मिळाला नाही. तत्कालिन मुख्यमंत्री जेबी पटनायक यांना तुषार गांधी यांनी पत्रव्यवहार करून अस्थी मिळाव्यात अशी विनंती केली होती. त्यानंतर जेव्हा तुषार गांधींनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यावेळी जेबी पटनायक यांनी ही अफवा असल्याचं सांगितलं होतं. तसेच 1950 मध्ये ओडिसाचे तत्कालिन मुख्यमंत्री नव कृष्ण चौधरी यांचा कोणीही सचिव नव्हता असं सांगितलं होतं.

Loading...

शेवटी 23 मार्च 1996 मध्ये एसबीआयच्या जनरल मॅनेजरना पत्र लिहून राज्य सरकारने सांगितलं की, लॉकरमध्ये असलेल्या बॉक्सची जबाबदारी राज्य सरकारची नाही. त्यामध्ये महात्मा गांधींच्या अस्थी असल्याचं सांगितलं जात आहे. बँकेने त्या बॉक्सबाबतचा निर्णय स्वत: घ्यावा.

गांधीजींचे पणतू तुषार गांधी यांनी उपोषणाचं अस्र उपसल्यानंतर राज्यसरकारने माघार घेतली होती. त्यावेळीच काही संघटनांनी हा मुद्दा उचलून धरला. शेवटी प्रकरण कोर्टात गेलं. राज्य सरकारने म्हटलं की, जर न्यायालयानं आदेश दिला तर गांधीजींच्या अस्थी आम्ही तुमच्याकडे सोपवू. न्यायालयाने बँकेच्या लॉकरमध्ये असलेल्या बॉक्सला तुषार गांधींकडे सोपवण्यात यावं असा निर्णय दिला.

1996 च्या शेवटी तुषार गांधी यांच्याकडे एसबीआयच्या लॉकरमध्ये असलेला बॉक्स देण्यात आला. त्यानंतर 30 जानेवारी 1997 रोजी अलाहाबादमध्ये संगमावर अस्थींचे विसर्जन करण्यात आले. मात्र, आजपर्यंत गांधीजींच्या अस्थी बँकेच्या लॉकरमध्ये का ठेवण्यात आल्या याची माहिती मिळू शकली नाही.

VIDEO : दुर्मीळ असा पोल्का डॉटेड झेब्रा, अंगावर नाहीत काळे पांढरे पट्टे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 2, 2019 06:52 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...