Home /News /national /

लग्नाची वरात ट्रॅक्टरमधून...शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्याचा तरुणाचा अनोखा प्रकार

लग्नाची वरात ट्रॅक्टरमधून...शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्याचा तरुणाचा अनोखा प्रकार

याशिवाय सुमित आणि त्याच्या नववधूने लग्नानंतर शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी दिल्ली सीमेवरील निषेधाच्या ठिकाणी भेट देण्याचं ठरवलं आहे

    हरियाणा, 4 डिसेंबर : केंद्राच्या शेती कायद्याच्या विरोधात हजारो शेतकऱ्यांनी त्यांच्या 'दिल्ली चलो' (Delhi Chalo) चळवळीचा एक भाग म्हणून दिल्लीच्या दिशेने कूच केली आहे. या चळवळीला सर्व क्षेत्रांतून पाठिंबा दर्शवला जात आहे. तसेच स्वतःच्या अनोख्या मार्गाने पाठिंबा देण्यासाठी हरियाणातील कर्नाल येथील एका तरुणाने फॅन्सी कारने आपल्या लग्नाच्या ठिकाणी न जाता ट्रॅक्टरमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. ट्रॅक्टरवरून स्वार होत आपल्या लग्नाच्या ठिकाणी पोहोचून त्यांनी शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला. शेती कायद्यांच्या (Agriculture Bill) विरोधात शेतकऱ्यांच्या निषेधाला समर्थन देण्यासाठी सेक्टर 6 कर्नाल येथील रहिवासी सुमित धुल्ल यांनी लग्नाच्या ठिकाणी ट्रॅक्टर चालवला. सुमित याने आपल्या लग्नासाठी सजवलेली मर्सिडीज (Mercedes) गाडी घरी ठेवली आणि त्याने ट्रॅक्टर (Tractor) बाहेर काढला तो ट्रॅक्टरने लग्नाच्या मांडवात पोहोचला. हे अनोखे वाहन वापरण्याचे कारण जेव्हा त्याला विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला की मी स्वतः एका शेतकरी कुटुंबातला तरुण आहे.  शेतकऱ्यांना माझा पूर्णपणे पाठिंबा दर्शवायचा आहे आणि त्यासाठीच मी लग्नाची वरात ट्रॅक्टरवरून काढत माझ्या लग्नाच्या मांडवात पोहोचण्याचे ठरवले. न्यूज एजन्सी ANI शी बोलताना सुमित म्हणाला की जरी आम्ही सगळे आता शहराच्या दिशेनी धावत असलो तरीही आमचं मूळ शेतीतच आहे. आमच्यासाठी प्रथम प्राधान्य कुठल्या गोष्टीसाठी असेल तर ते शेतीसाठी आहे आणि म्हणूनच माझा पूर्णपणे पाठिंबा हा शेतकऱ्यांना असणार आहे. तसेच सुमितचे मामा सुरिंदर नरवाल यांनी सांगितले की, सुमितला विवाहाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी आम्ही एका सजवलेल्या गाडीची पूर्णपणे व्यवस्था केलेली. परंतु शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी सुमितीने लग्नाच्या ठिकाणी जाण्याचे वाहन म्हणून मर्सिडीज गाडी न घेता ट्रॅक्टर घेण्याचा आग्रह धरला. तसेच नरवाल हे म्हणाले की, शेतकऱ्यांना पाठिंबा दाखवण्याचा त्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. तसेच सुमित आणि त्याची पत्नी त्यांच्या लग्नानंतर शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी दिल्ली सीमेवरील निषेधाच्या ठिकाणी भेट देणार आहेत. मागच्या आठवड्यापासून या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणांहून दिल्लीच्या सीमेजवळ अनेक शेतकरी दाखल झाले असून सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांनी दिल्लीत जाण्यास मज्जाव केला आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश (Uttar Pradesh), पंजाब (Panjab) आणि हरियाणा (Haryana) या मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. तसेच या घटनेत सरकार आणि आंदोलन करणारे शेतकरी यांच्यामध्ये गुरुवारी झालेल्या चर्चेत शेतीविषयक कायद्यांबाबत अडचणी सोडवण्यात अपयश आले आहे. आंदोलकांनी त्यांच्या मागण्यांबाबत विचार केल्यास त्यांना नकार देण्यात आलेला आहे. म्हणूनच आता शनिवारी (5 डिसेंबर) आणखीन एक चर्चा या बाबतीत घेतली जाणार आहे. हरियाणा-दिल्ली सीमेवर तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी निषेध करणाऱ्या शेतकऱ्यांना भेट दिली. टीएमसी नेत्यांनी सिंहू बॉर्डरवर तसेच महामार्गावर ट्रॅक्‍टर व इतर वाहने उभे केलेल्या शेतकऱ्यांच्या विविध गटांना भेट देण्यासाठी चार तास घालवले. तसेच सुरू असलेल्या शेतकर्‍यांच्या निषेधाबद्दल पाठिंबा व्यक्त करून समाजवादी पार्टी सोमवारपासून उत्तर प्रदेशातील सर्व जिल्ह्यांमध्ये किसान यात्रा सुरू करणार आहे. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी याची घोषणा केली आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Farmer, Protest

    पुढील बातम्या