उडुपी (कर्नाटक) 8 जून : प्रचंड उष्णतेमुळे सर्व देश हैराण झालाय. मान्सून लांबल्यामुळे पावसाचं आगमनही लांबतंय. त्यामुळे सर्वांचा जीव टांगणीला लागलाय. यावर्षी पाऊस कमी होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आल्याने सगळ्यांची चिंता आणखी वाढलीय. पाऊस लवकर यावा यासाठी कर्नाटकमध्ये चक्क बेडकाचं लग्न लग्न लावण्यात आलंय.
पाऊस लवकर येण्यासाठी देशातल्या विविध भागात लोक वेगवेगळ्या गोष्टी करत असतात. कुठे पुजा होते तर कुठे यज्ञ केले जातात. निसर्ग चक्रात बेडूक आणि पावसाचाही संबंध आहे. त्यामुळे अनेक भागात बेडकाचं लग्न लावण्याची प्रथा आहे. कर्नाटकच्या उडपीमध्ये शनिवारी बेडकाचं लग्न लावण्यात आलं.
यासाठी नर आणि मादी बेडकाची निवड करून त्यांना नवरी-नवरदेवासारखं सजविण्यात आलं. त्यांची मिरवणूक काढण्यात आली. लोकांना जेवायला घालण्यात आलं, मंगलअष्टकं म्हटली गेली आणि पावसासाठी प्रार्थनाही करण्यात आली. यावर अनेकांनी टीकाही केलीय. अशा गोष्टी करण्यापेक्षा झाडं लावण्यावर भर द्यावी अशी प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त होतेय.
#WATCH Frogs married in Karnataka's Udupi to please the rain gods. The frogs were dressed in custom made outfits for the ceremony. pic.twitter.com/s9I4rLT0Tu
— ANI (@ANI) June 8, 2019
विदर्भात उष्णतेची लाट
जून महिन्याचा पहिला आठवडा संपला तरी उन्हारा पारा कमी झालेला नाही. भाजून काढणाऱ्या उन्हाने राज्य होरपळून निघतंय. महाराष्ट्रात विदर्भात सगळ्यात जास्त उष्मा असून जगातल्या सर्वात उष्ण शहरांमध्ये चंद्रपूरचा समावेश झाला आहे. ही उष्णतेची लाट आणखी तीन दिवस अशीच राहणार असल्याचा इशार हवामान खात्याने दिला आहे.
विदर्भासोबतच मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्येही उष्णतेची लाट कायम राहणार आहे. प्रचंड उष्मा आणि उकाड्यामुळे अंगाची लाही लाही होतेय. सगळ्यांना प्रतिक्षा आहे ती मान्सूनच्या आगमनाची. केरळमध्ये थोड्या उशीराने मान्सून शनिवारी दाखल झाला. त्यानंतर तो देशभर पसरणार आहे तोपर्यं सगळ्यांनाच वाट पाहावी लागणार आहे.
गेल्या चार दशकांमध्ये यावर्षी सर्वात जास्त उष्मा होता. तीव्र उन्हाळा आणि पाणीटंचाईमुळे राज्यातल्या अनेक भागत लोकांनी स्थलांतरही केलं होतं. मुंबईतही उकाड्याने आणि घामांच्या धारांनी मुंबईकर हैराण झालाय.
मान्सून केरळमध्ये दाखल
सर्वांसाठी खुशखबर! कारण, आतुरतेनं वाट पाहत असलेला मान्सून अखेर केरळमध्ये दाखल झाला आहे. हवामान विभागानं याची घोषणा केली आहे. हळूहळू हा मान्सून पुढे सरकेल अशी माहिती देखील यावेळी हवामान विभागानं दिली आहे. 10 जूनला मान्सून दाखल होईल असा अंदाज होता. पण, दोन दिवस अगोदरच मान्सूनचं केरळमध्ये आगमन झालं आहे. राज्यात सध्या भीषण दुष्काळ आहे. पाणी टंचाईचा सामना देखील करावा लागत आहे. पण, आता केरळमध्ये मान्सूनचं आगमन झाल्यानं आता दिलासा मिळाला आहे. पुढील आठवड्यात मान्सून राज्यात दाखल होईल असा अंदाज यावेळी हवामान तज्ञ्ज रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला आहे. शिवाय, कोकणात देखील मान्सून पुढील 3 ते 4 दिवसांत मान्सून दाखल होईल अशी माहिती साबळे यांनी 'न्यूज18 लोकमत'शी बोलताना दिली. सकाळी वर्धा, मनमाड, कोल्हापुरात वादळीवाऱ्यासह झालेल्या मान्सून पूर्व पावसानं घरावरचं छप्पर देखील उडालं.