सुप्रीम कोर्टाचे हे माजी न्यायाधीश असतील देशाचे पहिले लोकपाल

सुप्रीम कोर्टाचे हे माजी न्यायाधीश असतील देशाचे पहिले लोकपाल

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लोकपाल नियुक्तीसाठी देशात तीव्र आंदोलन केलं होतं. अरविंद केजरीवाल आणि प्रशांत भुषण यांनी या आंदोलनाची धार देशभर पोहोचवली होती.

  • Share this:

नवी दिल्ली, 17 मार्च : गेली अनेक वर्ष चर्चेत असलेल्या लोकपालाची नियुक्ती आता झाली आहे. सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश पिनाकी चंद्र घोष हे देशाचे पहिले लोकपाल असतील अशी माहिती सूत्रांनी दिलीय. सोमवारी त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी लोकपाल निवड समितीची बैठक झाली. त्यात पीसी घोष यांची निवड करण्यात आली.

पीसी घोष हे सध्या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे (NHRC)  सदस्य आहेत. 2017 मध्ये ते सुप्रीम कोर्टातून निवृत्त झाले होते. लोकपाल निवड समितीमध्ये लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन, सरन्यायाधीश रंजन गोगोई, ज्येष्ठ वकिल मुकुल रोहतगी यांचा समावेश होता. विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांना या समितीत विशेष निमंत्रित म्हणून बोलावण्यात आलं होतं.

भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची चौकशी करण्यासाठी 2013 मध्ये लोकपाल आणि लोकायुक्त विधेयक मंजूर करण्यात आलं होतं. 16 जानेवारी 2014 ला हे विधेयक लागू करण्यात आलं होतं. पण आत्तापर्यंत लोकपालाची नियुक्ती करण्यात आली नव्हती.

लोकपाल नियुक्तीला विरोध होत असल्याच्या कारणावरून 'कॉमन कॉज'  या स्वयंसेवी संस्थेने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना कोर्टाने केंद्र सरकारला तातडीने लोकपालाची नियुक्ती करण्याचे आदेश दिले होते.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लोकपाल नियुक्तीसाठी देशात तीव्र आंदोलन केलं होतं. अरविंद केजरीवाल आणि प्रशांत भुषण यांनी या आंदोलनाची धार देशभर पोहोचवली. त्यानंतर सर्व देशात  एक वातावरण निर्माण झालं होतं. त्याचा फटका तत्कालीन मनमोहनसिंग सरकारला बसला.

अण्णांनी केलं स्वागत

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पी.सी. घोष यांच्या निवडीचे स्वागत केले आहे. अण्णा म्हणाले, 48 वर्षानंतर जनआंदोलनाला एक ऐतिहासिक विजय मिळाला आहे.

VIDEO: भीषण आगीत पोलीस ठाण्यातील 300 गाड्या जळून खाक

First published: March 17, 2019, 3:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading