मुंबई, 6 जुलै : गदर या हिंदी चित्रपटात सनी देओल पाकिस्तानमध्ये जाऊन 'हिंदुस्थान जिंदाबाद' ही घोषणा देतो. सनी देओलनं सिनेमात केलेलं काम प्रत्यक्ष करणारी व्यक्ती देखील भारतामध्ये आहे. ती व्यक्ती यापूर्वी काँग्रेसमध्ये सक्रीय होती. पण, त्यांनी आता भाजपामध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या भाजपा प्रवेशात महाराष्ट्रातील माजी मंत्री आणि भाजपा नेते विनोद तावडे यांची भूमिका निर्णायक ठरली आहे.
महाराष्ट्रातील सत्ता संघर्षामध्ये दूर असलेले भाजपा नेते विनोद तावडे (Vinod Tawade) यांची हरियाणात पॉवर दिसली आहे. तावडे हरियाणा प्रभारी असून त्यांच्या पुढाकारानं तरविंदर सिंह मारवाह (Tarvinder Singh Marwah) या काँग्रेस नेत्यानं भाजपामध्ये प्रवेश केला आहे. मरवा हे दिल्लीचे माजी आमदार असून पाकिस्तानमध्ये हिंदुस्थान जिंदाबाद या घोषणा त्यांनी दिल्या आहेत.
का सोडली काँग्रेस?
मरवाह यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यावर टीका करत काँग्रेलस सोडली आहे. 'मी माझं सर्व आयुष्य काँग्रेसला दिला होतं. पण, मला निराश होऊन पक्ष सोडावा लागत आहे. चपराशीची लायकी नसलेल्या व्यक्तींनाही पक्षात जागा दिली जातीय. राहुल गांधी यांना मी दीड वर्षांपासून भेटीची वेळ मागत आहे, पण मला भेट मिळाली नाही. मी उत्तराखंडचा प्रभारी होतो त्यावेळी आमचे राजा येत असतं आणि 4 मिनिटांमध्ये स्टेजवरून निघून जात. महारानी देखील कुणाला भेटत नाहीत. तर अमित शहा मला अत्यंत आपुलकीनं भेटले.' असं मारवाह यांनी सांगितलं.
पाकिस्तानमध्ये दिल्या घोषणा
तरविंद सिंग मारवाह हे दिल्लीतील जंगपूरा विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा निवडून गेले होते. त्यांनी 1998, 2003 आणि 2008 मध्ये विजय मिळवला होता. या काळात ते अनेकदा वादग्रस्त ठरले. 1999 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात दंगल करणे आणि पोलिसांना मारहाण करण्याचा त्यांच्यावर आरोप होता. या प्रकरणात कोर्टानं त्यांना पुढे क्लीन चिट दिली. 2013 पासून ते 3 वेळा विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले.
VIDEO मधून दिसेल निसर्गाचा प्रकोप! ढगफुटी, प्रलय, भूस्खलन... कुल्लू, शिमल्यात हाहाकार
2020 साली झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी त्यांच्या पाकिस्तान वारीचा उल्लेख केला होता. 'सध्या भाजपा नेते अनेकदा देशभक्तीबाबत बोलतात. पाकिस्तानचं नाव घेतात. पण त्यांनी (तरविंदर सिंह मारवाह) यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन हिंदुस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या होत्या. त्यामुळे त्यांना पाकिस्तानमधील जेलमध्ये बंद करण्यात आले होते. पाकिस्तानात जाऊन हिंदुस्तान जिंदाबादच्या घोषणा दिलेला एक तरी भाजपा नेता आहे का?' असा प्रश्न राहुल गांधी यांनी केला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Haryana, Vinod tawade