बिहारमधून फडणवीसांनी साधला CM उद्धव ठाकरेंवर निशाणा

बिहारमधून फडणवीसांनी साधला CM उद्धव ठाकरेंवर निशाणा

मारहाण करणाऱ्या 6 शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि 10 मिनिटांमध्ये सोडलं असा आरोपही त्यांनी केला.

  • Share this:

भोजपूर 12 सप्टेंबर: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे प्रभारी म्हणून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. फडणवीस हे सध्या बिहारमध्ये असून त्यांनी कामाला सुरूवातही केली आहे. सुशांत सिंग राजपूत प्रकरणावरून सध्या राजकारण तापलं आहे. बिहारमध्ये भाजपने हे प्रकरण निवडणुकीच्या प्रचारात वापरण्याचे संकेत दिले असून सुशांतसाठी न्याय अशी घोषणाही दिली आहे. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी राज्यातल्या ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्रात काही गुंडाराज आहे का? असा सवाल त्यांनी केला आहे.

भोजपूर इथं पत्रकार परिषदेत बोलतांना त्यांनी हल्लाबोल केला. फडणवीस म्हणाले, शिवसैनिकांनी नौदलाच्या माजी अधिकाऱ्याला मारहाण केली. हे कृत्य म्हणजे सरकारचं समर्थन असलेली दहशत पसरविण्याचं कामच आहे. राज्यात काही गुंडाराज आहे का? असा सवाल करत हे प्रकार कमी करा असं आवाहन मी उद्धव ठाकरे यांना केलं आहे असंही ते म्हणाले.

माजी नौदल अधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्या 6 शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि 10 मिनिटांमध्ये सोडलं असा आरोपही त्यांनी केला.

कांदिवली इथे राहणारे माजी नौदल अधिकारी मनोज शर्मा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर असलेलं व्यंगात्मक कार्टून फॉरवर्ड केलं म्हणून त्यांच्या घरात घुसून शिवसैनिकांकडून मारहाण करण्यात आली होती. शिवसेनेचे 2 शाखा प्रमुख आणि 7-8 शिवसैनिकांनी त्यांना मारहाण केल्याचा आरोप भाजपचे स्थानिक आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे.

हे वाचा - मुंबईत राष्ट्रपती राजवट लागू करा,मारहाण झालेल्या माजी अधिकाऱ्याच्या मुलीची मागणी

या हल्ल्याचा आपण निषेध करत असून अशा गुंडागर्दीमुळे महाराष्ट्र आणि मुंबईतील जनता आपला आवाज गप्प करणार नाही असंही भातखळकर यांनी म्हटलं आहे. मारहाण करण्यात आलेल्या व्यक्तींवर मुंबईतील एका रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे.

दरम्यान, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी जखमी झालेले माजी अधिकारी मनोज शर्मा यांची फोन करून विचारपूस केली.  लष्करातल्या माजी अधिकाऱ्यांवर असे हल्ले होणं योग्य नाही असं ही सिंह यांनी म्हटलं आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: September 12, 2020, 5:24 PM IST

ताज्या बातम्या