चेन्नई, 27 जानेवारी: तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे.जयललिता यांच्या निधनानंतर देखील त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होत आहेत. त्यामुळेच त्यांची संपत्ती, बँक खाते आणि इनकम टॅक्स संदर्भतील संकट अद्याप टळलेले नाही. जयललिता यांच्या बँक खात्यात प्रत्येक महिन्याला पैसे जमा केले जात आहेत.
आयकर विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आम्हाला जी माहिती उपलब्ध आहे त्यानुसार जयललिता यांच्या बँक खात्यात प्रत्येक महिन्याला पैसे जमा केले जात आहेत. जयललिता यांच्याकडे असलेल्या व्यावसायिक आणि अन्य संपत्तीच्या भाड्याची रक्कम त्यांच्या खात्यात जमा केली जात आहे. हे पैसे कोडानाड इस्टेटसह संपत्तीच्या माध्यमातून भाड्याचे पैसे येत आहेत.
जयललितांच्या मृत्यूनंतर देखील त्यांची आयकर सीमा वाढत आहे. आतापर्यंत कोणीही कराची ही रक्कम भरण्यास पुढे आली नाही. आयकर विभागाला माजी मुख्यमंत्र्यांकडून 2016-17 आणि 2017-18 या दोन आर्थिक वर्षांसाठीचा टॅक्स रिटर्न अद्याप मिळालेला नाही.
करापोटी 16 कोटी न जमा केल्याने आयकर विभागाने जयललिता यांच्या प्रसिद्ध पोएस गार्डन घरासह चार मालमत्ता 2007मध्येच अटॅच केल्याचा धक्कादायक खुलासा विभागाने दोन दिवसापूर्वी केला होता. अण्णा द्रमुकच्या सर्वेसर्वा असलेल्या जयललिता यांचे ५ डिसेंबर 2016 रोजी रुग्णालयात निधन झाले होते.
Special Report : पंकजा मुंडे, बीडची रेल्वे रूळावर कधी येणार?