नवी दिल्ली, 28 एप्रिल: देशात 18 वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांचं 1 मेपासून लसीकरण (COVID-19 vaccination) केलं जाणार आहे. त्यासाठी आज 28 एप्रिलपासून को-विन पोर्टलवर (Co-Win) नोंदणी करता येईल, असं केंद्र सरकारने सांगितलं होतं. मात्र, वेळेचा स्पष्ट उल्लेख नसल्यानं बऱ्याच जणांनी मध्यरात्री 12 वाजल्यापासून नोंदणी करायला सुरुवात केली. मात्र, त्यांना त्यात अडचण येत होती. आता याबाबत स्पष्ट वेळ केंद्र सरकारकडून घोषित करण्यात आली आहे. तुम्हाला आज सायंकाळी 4 पासून को-विन अॅपवर लसीकरणासाठी नोंदणी करता येणार आहे, असं वृत्त झी न्यूजने दिलं आहे.
आरोग्य सेतू अॅपच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती देणारं ट्विट करण्यात आलंय. त्यात म्हटलंय "18 वर्षांवरील नागरिकांना 28 एप्रिललाhttp://cowin.gov.in या वेबसाईटवरून तसंच आरोग्य सेतू अॅप (Aarogya Setu App) आणि उमंग अॅपवरून (UMANG App) सायंकाळी 4 पासून नोंदणी करता येईल. तसंच 1 मे रोजी सुरूहोणाऱ्या लसीकरणासाठी किती केंद्र तयार आहेत, हे तपासून सरकारी (State Govt centers) आणि खासगी लसीकरण केंद्रातील (Private centers) अपॉइंटमेंट नागरिकांना दिल्या जातील."
Registration for 18 plus to begin on https://t.co/S3pUooMbXX, Aarogya Setu App & UMANG App at 4 PM on 28th April. Appointments at State Govt centers & Private centers depending on how many vaccination centers are ready on 1st May for Vaccination of 18 plus. #LargestVaccineDrive
— Aarogya Setu (@SetuAarogya) April 28, 2021
देशात 16 जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात आली होती. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी (Health Care Workers) आणि Front Line Workers चं लसीकरण केलं गेलं. त्यानंतर 1 मार्च ते 1 एप्रिल दरम्यान राबवलेल्या दुसऱ्या टप्प्यात 45 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं.
भारत सरकारने आपात्कालीन परिस्थितीत लसीकरणासाठी दोन लसींना परवानगी दिली आहे. यामध्ये सीरम इंस्टिट्यूटच्या (Serum Institute of India) कोव्हिशिल्ड (COVISHEILD) आणि भारत बायोटेकच्या (Bharat Biotech) कोव्हॅक्सिन (COVAXIN) लसीचा समावेश आहे. तसंच नुकतंच केंद्र सरकारने रशियाच्या स्पुतनिक (Sputnik) या लसीच्या उत्पादनाला परवानगी दिली आहे.
सीरम इन्स्टिट्युट आणि भारत बायोटेकने लसीचे दर जाहीर केले आहेत. कोव्हिशिल्ड लसीसाठी सरकारकडून प्रतिडोस 400 रुपये आकारण्यात येणार आहेत. तर, कोव्हॅक्सिनची सरकारसाठी 600 रुपये किंमत ठेवण्यात आली आहे. खासगी केंद्रांमध्ये लसीकरणासाठी दोन्ही कंपन्यांनी वेगवेगळे दर निश्चित केले आहे.
देशात आतापर्यंत 14 कोटी 78 लाख 27 हजार 367 नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे. देशातील वाढती रुग्णसंख्या पाहता लसीकरण मोहीमेचा वेग वाढवणं आवश्यक झालंय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona vaccination, Corona vaccine, Coronavirus, India