NaMo Vs RaGa : पराभवाचा वचपा काढण्यासाठी नरेंद्र मोदींचं 'मिशन 100'

NaMo Vs RaGa : पराभवाचा वचपा काढण्यासाठी नरेंद्र मोदींचं 'मिशन 100'

'मिशन 100'. च्या योजनेनुसार पुढच्या तीन महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभर फिरून भाजपसाठी अनुकूल वातावरण तयार करणार आहेत.

  • Share this:

मुंबई, 8 जानेवारी: लोकसभेच्या 2019 च्या निवडणुकीचे पडघम आता वाजू लागले आहेत. पाच राज्यात झालेला पराभव भाजपच्या जिव्हारी लागलाय. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढ मधला पराभव हा भाजपसाठी धक्कादायक ठरला. परभवाचा हा धक्का पचवत त्याचा वचपा काढण्यासाठी भाजपनं जोरदार कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणजे भाजपचं 'मिशन 100'. च्या योजनेनुसार   पुढच्या तीन महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभर फिरून भाजपसाठी अनुकूल वातावरण तयार करणार आहेत.

2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने त्यांच्या दिल्लीतल्या मुख्यालयात हायटेक 'वॉर रूम' तयार केलीय. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या नेतृत्त्वाखालील टीम मोहिम फत्ते करण्यासाठी अत्यंत बारिक-सारिक गोष्टींच नियोजन करत आहे.

2014 च्या ऐतिहासिक निवडणुकीत मोदी लाट असताना भाजपने ज्या 123 जागा जिंकल्या नव्हत्या, त्या जागेसाठी भाजपने खास योजना आखलीय. अतिशय कमी फरकाने किंवा अन्य काही कारणांमुळे भाजपला त्या जागा गमवाव्या लागल्या होत्या. त्या जागा जिंकण्याचं टार्गेट भाजपने ठेवलं आहे.

हे 'टार्गेट 123' पूर्ण करण्यासाठी त्या सर्व जागांची भाजपने 25 भागांमध्ये विभागणी केलीय. आणि त्यातल्या प्रत्येक भागाची जबाबदारी एका सक्षम नेत्याकडे देण्यात आलीय. पुढच्या शंभर दिवसांमध्ये पंतप्रधान मोदी हे या 123 जागा असलेल्या सर्व भागांचा दौरा करणार आहेत.

यात ते तब्बल 20 राज्यांना कव्हर करतील. भाजपच्या कार्यकर्त्यांना सक्रीय करणं, नवीन मतदारांना आकर्षित करणं आणि सरकारने केलेल्या कामाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणं हे मोदींच्या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

पश्चिम बंगाल, आसाम आणि ओडिशा या राज्यांमध्ये लोकसभेच्या एकूण 77 जागा आहेत. सध्या त्यातल्या फक्त 10 जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत.

इतर जागांची भरपाई करायची असेल तर या तीन राज्यांमध्ये मोठी संधी भाजपला दिसते. त्यामुळे पंतप्रधान जास्तित जास्त कार्यक्रम या तीन राज्यांमध्ये करणार आहेत. या 77 जागांपैकी 60 जागा जिंकण्याचं भाजपचं टार्गेट आहे.

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींची जादू कायम असली तरी भाजपचाही जोर तिथे वाढतो आहे.

पश्चिम बंगाल

ममता बॅनर्जींवर तुष्टिकरणाचा आरोप करत भाजप तिथे हिंदुत्वाचं कार्ड खेळत आहे. पंचायत निवडणुकांमध्ये तृणमूल नंतर सर्वाधिक जागा भाजपला मिळाल्या होत्या. त्यामुळे मुसंडी मारण्यासाठी ही स्थिती अनुकूल असल्याचं भाजपला वाटतंय.

ओडिसा

ओडिसात मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांना दिर्घकाळ सत्तेत राहिल्याने लोकांच्या नाराजीचा सामना करावा लागतोय. तिथेही पंचायत निवडणुकांमध्ये भाजपने चांगली कामगिरी केलीय. त्यामुळे तिथेही भाजपला आशा आहे.

आसाम

तर आसाममध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपने घवघवीत यश मिळवलं. पूर्वोत्तर राज्यांमध्ये पायाभूत सुविधांमध्ये मोठं काम झाल्याने भाजपसाठी सकारात्मक वातावरण आहे. त्यामुळे 14 जागांपैकी किमान 10 जागा मिळविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

या दौऱ्यात मोदी विविध प्रकल्पांची सुरूवात करतील, जाहीर सभा घेतील, बुद्धिवंतांना भेटतील, तरुणांशी संवाद साधतील अशी भाजपची योजना आहे.

First published: January 8, 2019, 1:57 PM IST

ताज्या बातम्या