Home /News /national /

रोटी मेकरनंतर आता फूट मसाज यंत्र; शेतकऱ्यांच्या आंदोलनात स्वयंसेवी संस्थांकडून मदतीचा हात

रोटी मेकरनंतर आता फूट मसाज यंत्र; शेतकऱ्यांच्या आंदोलनात स्वयंसेवी संस्थांकडून मदतीचा हात

आता आंदोलनकर्त्यांसाठी तात्पुरत्या स्वरुपात जिम (Gym) आणि फूट मसाज यंत्र (Foot Massager) बसवण्यात आले आहे.

    नवी दिल्ली, 12 डिसेंबर :  कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी दिल्ली (Delhi) सीमेवर गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन (Farmers Agitation) सुरु आहे. आंदोलनात सहभागी शेतकऱ्यांची संख्या पाहता, त्यांच्या भोजनाची योग्य ती सोय व्हावी म्हणून आंदोलनस्थळी नुकतीच रोटी (चपाती) मशीन (Roti Machine) बसवण्यात आले होते. त्यानंतर आता आंदोलनकर्त्यांसाठी तात्पुरत्या स्वरुपात जिम (Gym) आणि फूट मसाज यंत्र (Foot Massager) बसवण्यात आले आहे. केंद्र सरकारने सप्टेंबरमध्ये कृषी विषयक तीन कायदे केले. त्यानुसार गेल्या अनेक दशकांपासून असलेले शेतीमाल विक्री, साठवणूक आदींबाबतचे नियम शिथिल करण्यात आले. परंतु, या सुधारणांना शेतकऱ्यांचा विरोध असून हजारो शेतकरी गेल्या काही महिन्यांपासून आंदोलन करीत आहेत. या आंदोलनकर्त्यांनी राजधानी दिल्लीच्या सिंघू आणि टिक्री सीमेवर तळ ठोकला असून काही महिने पुरेल इतके रेशन देखील सोबत आणले आहे. खालसा एड (Khalsa Aid) या आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्थेनी या आंदोलनकर्त्यांसाठी सीमेच्या मध्यवर्ती भागात फूट मसाज केंद्र सुरु केले आहे. आंदोलनात सहभागी वयस्कर शेतकरी तंदुरुस्त राहवेत यासाठी हे केंद्र सुरु करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या तंबूलगत सुमारे 25 यंत्रे बसवण्यात आली असून या यंत्रांव्दारे शेतकऱ्यांच्या पायाच्या तळव्यांना सुमारे 10 मिनिटे मसाज दिला जात आहे. आम्ही सिंघू सीमेवर असलेल्या आंदोलनकर्त्या वृध्द शेतकऱ्यांना आराम मिळावा याकरिता त्यांच्या पायाला मालिश करण्यासाठी ही यंत्रणा उभारली असल्याचे खालसा एड इंडिया संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक अमरप्रित यांनी एएनआय (ANI) या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. पहिल्या दिवशी सुमारे 500 शेतकऱ्यांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे. एनडीटिव्हीच्या वृत्तानुसार, अनेक आंदोलनकर्ते हे दूरवरुन पायी प्रवास करुन आल्याने थकले होते. या सुविधेमुळे या शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. खालसा एड फौउंडेशनने आंदोलनस्थळी शेतकऱ्यांसाठी चहा, नाष्ट्याची देखील सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. फौउंडेशनचे संस्थापक अमरप्रित सिंह यांनी एनडीटिव्हीला (NDTV) सांगितले की आमच्या संस्थेने आंदोलनस्थळी 20 मोबाईल टायलेट (Mobile Toilet) उभारले आहेत. कडाक्याच्या थंडीत आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना अडचणींना सामना करावा लागू नये यासाठी येथे रोटी (चपाती) तयार करण्याचे मशीन देखील बसवण्यात आले आहे. अशी रोटी (चपाती) मशीन्स सामान्यतः गुरुव्दारांमध्ये बसवण्यात येतात. अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात येणाऱ्या हजारो भाविकांच्या सोयीसाठी असे यंत्र बसवण्यात आले आहे. या मशीनव्दारे एक तासात 1500 ते 2000 रोट्या (चपाती) तयार करता येऊ शकतात. या मशीनच्या प्रात्यक्षिकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल झाला आहे. या मशीनमध्ये कणकेचे गोळे टाकले जातात. त्यानंतर या गोळ्यापासून रोटी (चपाती) तयार होते. त्यानंतर यंत्रावर विशिष्ट तापमानावर एखादी व्यक्ती ही रोटी (चपाती) भाजते. त्यानंतर यंत्रातून खाण्यायोग्य तयार रोटी (चपाती) बाहेर पडते.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Farmer, Protest

    पुढील बातम्या