मुंबई, 14 जानेवारी : नव्या वर्षात काही नवं करण्याची प्रत्येकाची इच्छा असते आणि हे तर 21 व्या शतकातलं 21 वं वर्ष, मग नवं काही व्हायलाच हवं. भारतात नेहमीच महिलांना सर्व क्षेत्रात समान संधी देण्याचा प्रयत्न झाला आहे, अशीच एक ऐतिहासिक घटना 5 जानेवारी 2021 ला झाली. भारतीय रेल्वेमध्ये महिला सध्या विविध पदांवर काम करतात. लोकल ट्रेन आणि एक्सप्रेस ट्रेनही त्या चालवतात. देशातील पहिली मालगाडी संपूर्ण महिलांच्या क्रूने चालवून 5 जानेवारीला नवा इतिहास रचला.
नव्या वर्षाची नवी सुरुवात करत पुरुषी वर्चस्व असलेल्या आणखी एका क्षेत्रात महिलांनी आपलं पाऊळ ठेवलं. पालघर जिल्ह्यातील वसई रेल्वे स्टेशनवरून ही मालगाडी निघून गुजरातमधल्या बडोद्याला पोहोचली. या मालगाडीला 43 बंदिस्त वॅगन जोडले होते आणि त्यात 3686 टन माल भरला होता.
ही मालगाडी चालवणाऱ्या क्रुचं नेतृत्व केलं आकांक्षा रे यांनी आणि त्यांच्यासोबत होत्या उदिता वर्मा आणि कुमकुम सूरज डोंगरे. पश्चिम रेल्वेने केलेल्या या प्रयोगामुळे भारतीय रेल्वेच्या इतिहासात नव्या विक्रमाची नोंद झाली आहे, कारण या आधी महिला क्रूने मालगाडी चालवली नव्हती.
कोण आहेत या महिला?
हा प्रवास यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या क्रूमधील आकांक्षा यांनी इंदूरमधून एमबीए केलं आहे. कुमकुम या लोको पायलट म्हणजे रेल्वे ड्रायव्हर आहेत. उदिता यांनी सीनिअर असिस्टंट लोको पायलट म्हणून काम केलं आहे, असं मुंबई मिररच्या वृत्तात म्हटलं आहे.
Western Railway breaks yet another stereotype!
An all-female crew piloted a Goods train from Vasai Road to Vadodara on 5th January, 2021 which has set a glaring example that no job is beyond the capacity of women to perform as well as to excel. @drmbct pic.twitter.com/EdLpMYJU3y
— Western Railway (@WesternRly) January 6, 2021
आकांक्षा म्हणाल्या, ‘आमच्या या प्रयत्नामुळे परंपरागत पुरुषी वर्चस्व असलेल्या इतर क्षेत्रांतही जाण्याची प्रेरणा महिलांना मिळू शकेल.’
पश्चिम रेल्वेचा पाठिंबा
पश्चिम रेल्वेने महिलांच्या या उपक्रमाला पाठिंबा दिला होता आणि त्यांचं कौतुक करण्यासाठी या महिला क्रूचा फोटो पश्चिम रेल्वेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करण्यात आला आहे. या उपक्रमाबद्दल पश्चिम रेल्वेचे जनरल मॅनेजर आलोक कंसल यांनी ऑलमनोरमा पोर्टलला प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘ पश्चिम रेल्वेने आणखी एक स्टिरिओटाइप मोडला आहे आणि हा उपक्रम रेल्वेच्या इतिहासात नोंदला जाईल. महिलांना कोणत्याच क्षेत्रात काम करणं अशक्य नाही, हे या महिलांनी सिद्ध करून दाखवलं.’
महिला रेल्वेत नोकरीला उत्सुक
‘द वायर’च्या वृत्तानुसार भारतीय रेल्वेने 2019 मध्ये ड्रायव्हर, वेल्डर, फिटर आणि मशिनिस्ट या पदांसाठी भरतीची जाहिरात दिली होती. या पदांसाठी पाच लाख महिलांनी अर्ज केले आहेत. पुरुषांनी 42 लाख अर्ज केले आहेत. पुरुषांच्या तुलनेत महिलांचे अर्ज कमी असले तरीही पाच लाख ही संख्या मोठी आहे. रेल्वेने सर्व विभागांत ड्रायव्हरसह वर्कशॉपमधील अवजड कामांसाठीही 500 महिलांना नोकरी दिली आहे. यामुळे पुरूषी वर्चस्व असलेल्या या क्षेत्रातही महिला आपला ठसा उमटवत आहेत. स्वच्छतागृह उपलब्ध नसणं, कामाच्या विचित्र वेळा, नाइट शिफ्ट, असुरक्षित मार्गांवरील प्रवास, अशा अनेक आव्हानांची जाणीव असूनही अनेक महिला रेल्वेमध्ये नोकरी करण्यास उत्सुक आहेत.
भारतातल्या पहिल्या महिला लोको पायलट
सुरेखा यादव यांनी 1988 मध्ये पहिल्यांदा सेंट्रल रेल्वेची ट्रेन चालवली होती. त्या रेल्वेच्या इतिहासातील पहिल्या महिला लोको पायलट आहेत. त्यानंतर त्यांनी महिला दिनाच्या निमित्ताने पुण्याहून मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारी डेक्कन क्वीनही चालवली होती. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी केंद्रीय रेल्वेमंत्री असताना 2000 साली देशातील पहिली लेडिज स्पेशन ट्रेन धावली होती, ती ट्रेनही सुरेखा यादव यांनी चालवली होती.